आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपाने नुकतेच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये एकूण १९५ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता काँग्रेसनेही आज (८ मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या यादीमध्ये एकूण ३९ उमेदवारांची नावे असून यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, वरिष्ठ नेते शशी थरूर यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एकूण ३९ नेत्यांचा समावेश आहेत. याच पहिल्या यादीत राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल यांची नावे आहेत. राहुल गांधींना काँग्रेसने वायनाड या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. २०१९ साली त्यांनी वायनाड आणि अमेठी या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र ते पुन्हा एकदा अमेठीतून निवडणूक लढवणार का? हा प्रश्न अद्याप कायम आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना त्यांच्या तिरुअनंतपुरम या मतदारसंघातूनच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा याच मतदारसंघातून तिकीट दिले आहे.

डी के शिवकुमार यांच्या बंधूंना उमेदवारी

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यांना काँग्रेसने छत्तीसगडच्या राजनंदगाव या मतदारसंघातून तिकीट दिले आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांचादेखील समावेश आहे. ते केरळमधील अलापुझ्झा या जागेवरून निवडणूक लढवतील. २००९ साली वेणूगोपाल यांनी याच जागेवर विजयी कामगिरी करून दाखवली होती. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचे बंधू डी के सुरेश यांनादेखील काँग्रेसने पहिल्याच यादीत तिकीट दिले आहे. ते बंगळुरू ग्रामीण या मतदारसंघातून निवडणूक लढवतील.