माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार नंदन नीलेकणी यांना काँग्रेस पक्ष पंतप्रधानपदाचे उमेदवार करणार असल्याचे वृत्त निव्वळ कल्पनाविलास असल्याचे पक्षप्रवक्ते संदीप दीक्षित यांनी स्पष्ट केले. या पदासाठी राहुल गांधी किंवा इतर कुणाला निवडायचे हा निर्णय काँग्रेस पक्षाचे नेतृत्व घेईल, असे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी आमचे नेते आहेत, मात्र त्यांना या पदावर नेमणार काय याबाबत आपल्याला माहिती नाही, असे सांगत प्रश्नांपासून सुटका करून घ्यायचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर मनमोहन सिंग यांना बदलणार असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे काँग्रेसने पुन्हा स्पष्ट केले. देशभरातील नागरिकांना आधार कार्डाची जी अभिनव संकल्पना आहे त्यामागे नीलेकणी आहेत. त्यांची स्वच्छ प्रतिमा पाहता काँग्रेस पंतप्रधानपदासाठी त्यांचे नाव जाहीर करेल, ही माहिती कुठून आली हेच माहीत नाही, असे दीक्षित यांनी वारंवार स्पष्ट केले. बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मते राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. अर्थात राहुल यांनी मात्र या पदाबाबत फारशी उत्सुकता दाखवलेली नाही.