राज्यसभेत भाषण करताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा कडाडून टीका केली. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळूनही ब्रिटिशांच्या मानसिकतेने गुलामगिरीची मानसिकता पसरवत काम केलं असं त्यांनी म्हटलं. एवढंच काय काँग्रेसने बजेट म्हणजेच अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ ही देखील संध्याकाळी ५ अशी निवडली होती कारण ब्रिटनमध्ये तेव्हा सकाळचे नऊ वाजलेले असत. ही उदाहरण देऊन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसची अक्षरशः पिसं काढली. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न न दिल्याचा मुद्दाही उपस्थित केला.
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसवर लोकसभेत टीका करताना कर्पुरी ठाकूर यांच्या भारतरत्न पुरस्काराचा मुद्दा मोदींनी उपस्थित केला होता. कर्पुरी ठाकूर यांचं योगदान इतकं मोठं असूनही इतक्या वर्षांमध्ये काँग्रेसने त्यांचा सन्मान केला नाही असं मोदी म्हणाले होते. तर आज त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतरत्न पुरस्काराचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काय म्हणाले मोदी?
“काँग्रेसची सत्ता इतका काळ देशात होती. मात्र बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न द्यावं असं काँग्रेसला वाटलं नाही. काँग्रेसने सत्तेवर असताना फक्त आपल्या घराण्यातल्या लोकांना पुरस्कार दिले. तसंच काँग्रेसने ओबीसींना आरक्षणही नीट दिलं नाही.” असाही आरोप मोदी यांनी राज्यसभेत केला.
बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपवण्यासाठीचे कुठलेही प्रयत्न काँग्रेसने सोडले नाहीत. त्यांना भारतरत्न पुरस्कार भाजपाच्या पाठिंब्याने जे सरकार स्थापन झालं होतं तेव्हा त्यांना पुरस्कार जाहीर झाला. सीताराम केसरी हे मागास होते काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांना अध्यक्षपदावरुन रस्त्यावर फेकण्यात आलं. त्याचा व्हिडीओही उपलब्ध आहे. यांचे एक मार्गदर्शक अमेरिकेत आहेत. गेल्या वेळी निवडणुकीच्या वेळी हुआ तो हुआ साठी प्रसिद्ध झाले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान काही नव्हतं हे सांगायचा प्रयत्न केला. देशात पहिल्यांदा आदिवासी समाजातली स्त्री राष्ट्रपती झाली. तुमचा आमच्याशी वैचारिक विरोध होता का? नाही. तसं असतं तर तुम्ही आमच्या विरोधात तसा सशक्त उमेदवार दिला असता. पण तुम्हाला आदिवासी समाजाच्या भगिनीचा अपमान करायचा होता म्हणून तुम्ही उमेदवार दिला. असाही आरोप नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही राष्ट्रपतींसाठी जी भाषा त्यांनी (काँग्रेसने) वापरली ती तर निषेधार्हच आहे. असंही मोदी म्हणाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार कुणी दिला?
भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ३१ मार्च १९९० या दिवशी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी देशाचे पंतप्रधान व्ही.पी. सिंग होते. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक विषमता मिटवून समता आणण्याचे जे प्रयत्न केले तसंच आयुष्यभर समाजातल्या पीडितांसाठी जो संघर्ष केला त्या कार्याला अभिवादन करत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. आज मोदींनी याच मुद्द्याचा संदर्भ देत काँग्रेसवर कडाडून टीका केली. तसंच काँग्रेसने ब्रिटिश गेले पण त्यांची गुलामगिरीची मानसिकता देशात स्वातंत्र्यानंतरही राबवली असाही उल्लेख केला.
गुलामगिरीची मानसिकता स्वातंत्र्यानंतर कुणी राबवली?
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळूनही देशात गुलामगिरीची मानसिकता कुणी वाढवली? जर तुम्ही इंग्रजांपासून प्रभावित नव्हता तर दंड संहिता जी इंग्रजांनी तयार केली होती ती बदलली का नाही? इंग्रजांच्या काळातले शेकडो कायदे का बदलले नाही? लाल बत्ती संस्कृती किती दशकं देशात सुरु होता? भारताचं बजेट संध्याकाळी पाच वाजता मांडलं जात होतं कारण ब्रिटन संसदेत त्यावेळी सकाळचे नऊ वाजलेले असत. त्या वेळेला अनुसरुन ही परंपरा सुरु होती. इंग्रजांपासून प्रेरणा घेतली नव्हती तर मग सैन्यांच्या चिन्हांवर गुलामीची प्रतीकं का होती? तुमच्यावर इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर राजपथाचं नाव कर्तव्यपथ करण्यासाठी मोदींची वाट देशाला का बघावी लागली? अंदमान आणि निकोबार या द्विपसमूहांवर इंग्रजी सत्तेचं निशाण का होतं? या देशातल्या सेनेचे जवान देशासाठी शहीद होतं मात्र तुम्ही वॉर मेमोरियल का केलं नाहीत? इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर मग भारतीय भाषांकडे हीन भावनेने का पाहिलं? तुम्ही जर इंग्रजांच्या प्रभावाखाली नव्हतात तर भारताचा उल्लेख कुठेही मदर ऑफ डेमोक्रसी का केला नाहीत? देश हे काहीही विसरलेला नाही. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.