अयोध्येत राम मंदिर उभं राहतं आहे त्यामुळे अयोध्येला गतवैभव प्राप्त होतं आहे. अशावेळी काही लोकांच्या मनात अयोध्येबाबत द्वेष आहे. काँग्रेसने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. उलट त्यांनी या सोहळ्याला येणं अपेक्षित होतं असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. तसंच काँग्रेसने मतपेटीच्या राजकारणासाठी राम मंदिराचा वापर केला असाही आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे योगी आदित्यनाथ यांनी?

“१९८९ मध्ये काँग्रेसने प्रचाराचा नारळ अयोध्येतून फोडला होता. मतपेटीचं राजकारण केलं ते रामाचं नाव घेऊनच. आता ते आमच्यावर आरोप करत आहेत. काँग्रेसने हिंदू जनतेला मूर्ख बनवलं आणि मुस्लिम मतपेटीचाही मोह त्यांना सोडवत नव्हता. त्यांच्याकडे देशाची सत्ता दीर्घकाळ होती त्यांनी मंदिर उभारण्यासाठी काही हालचाली का केल्या नाहीत? आम्हाला राम मंदिर उभारलं जावं यासाठी कोर्टात दाद मागावी लागली. आम्ही स्थानिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला आणि आता राम मंदिर उभं राहतं आहे. आम्ही राजकारण केलं नाही. देशाची जी आस्था होती त्यानुसार आम्ही वागलो त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे.” असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केलं आहे.

हे पण वाचा- शेफ विष्‍णू मनोहर करणार अयोध्‍येत ७ हजार क‍िलोचा ‘श्रीराम शिरा’

विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण आहे तरीही प्राणप्रतिष्ठा केली जात आहे या विरोधकांच्या आरोपांनाही योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिलं. अयोध्येत जे काही होतं आहे ते शास्त्रांनुसारच होतं आहे. मकर संक्रांत झाल्यानंतर सूर्याचा उत्तरायणात प्रवेश होतो. त्यानंतर अनेक शुभ मुहूर्त असतात. त्यानुसारच रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाते आहे. तसंच गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा केली जाणं ही बाब अयोध्येत पहिल्यांदा झालेली नाही. असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

शंकराचार्यांबाबत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात शंकराचार्यांनी सहभागी झालं पाहिजे. आम्ही त्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे. आज जो क्षण जवळ येऊन ठेपला आहे तो श्रेयवादाचा किंवा मान-अपमानाचा नाही. मी असेन, देशाचा सामान्य नागरिक असेल किंवा शंकराचार्य कुणीही रामापेक्षा मोठं नाही. प्रभू रामचंद्रांपेक्षा मोठं कुणीही नाही. प्रत्येक माणसाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शंकराचार्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे. त्यांनी ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये. त्यांनी जरुर या सोहळ्याला उपस्थित राहिलं पाहिजे, असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

एक काळ असा होता की शरयू नदीच्या किनाऱ्यावर गोळीबार व्हायचा

अयोध्येत मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. ५० ते ६० वर्षे एक पक्ष सत्तेत होता. त्यांनी मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? आमची प्रभू रामावर प्रगाढ श्रद्धा होती. त्यामुळेच निर्णय यायचा बाकी होता तरीही दीपोत्सव आम्ही सुरु केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा त्यामागे होती. तसंच अयोध्येत आम्ही अनेक सुधारणा केल्या. एक काळ असा होता की शरयूच्या किनाऱ्यावर गोळ्या झाडल्या जात होत्या. ही सगळी परिस्थिती बदलली आहे. अयोध्येत आता चार पदरी रस्ता आहे. घाणींचं साम्राज्य होतं. आधीच्या सरकारांनी तर घाणीच्या साम्राज्यात लोकांना ठेवलं. अंधारात ठेवलं. वीजही पुरेसा वेळ नव्हती. अयोध्या एक छोटं स्टेशन होतं. आज संपूर्ण सुविधा असलेलं स्टेशन आहे. तसंच आंतराराष्ट्रीय विमानतळ तिथे झालं आहे. या सुधारणा गेल्या १० वर्षांत झाल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress did politics name of ram temple cm yogi said who started the election campaign from ayodhya scj
Show comments