दोन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांमधल्या निवडणुकांची घोषणा केली. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्च या महिन्याभराच्या कालावधीत ७ टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला थेट वाळवीची उपमा दिली आहे. तसेच, योगी आदित्यनाथ यांच्या राजकारणावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे.
दिग्विजय सिंह यांनी इंदोरमध्ये माध्यमांशी बोलताना टीका केली. “आरएसएस एखाद्या वाळवीप्रमाणे आहे. जशी वाळवी हळूहळू संपूर्ण घर किंवा घरातील वस्तू उद्ध्वस्त करते, तशाच प्रकारे आरएसएस देखील हळूहळू आणि सावधपणे संपूर्ण व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहे”, असं दिग्विजय सिंह म्हणाले. त्यांच्या या विधानावरून आता नवी चर्चा सुरू झाली असून त्यावर भाजपा किंवा आरएसएसकडून देखील प्रत्युत्तर येण्याची शक्यता आहे.
“मी RSS ला वाळवी म्हणालेलो नाही”
दरम्यान, संभाव्य टीका लक्षात घेता दिग्विजय सिंह यांनी लागलीच आपण आरएसएसला वाळवी म्हणालो नसल्याचं देखील स्पष्टीकरण दिलं. “मला माहिती आहे की आरएसएस आणि वाळवीची तुलना केल्यामुळे माझ्यावर भरपूर टीका केली जाणार आहे. पण मी आरएसएसला वाळवी म्हणालेलो नाही. संपूर्ण व्यवस्थेला हळूहळू उद्ध्वस्त करणाऱ्या आरएसएसच्या विचारसरणीला मी वाळवी म्हणालेलो आहे”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
हिंदुत्वाविषयी चुकीचा प्रचार
दरम्यान, यावेळी बोलताना दिग्विजय सिंह यांनी हिंदुत्वाविषयी देशात चुकीचा प्रचार सुरू असल्याचं सांगितलं. “हिंदु धर्म संकटात असल्याचा खोटा प्रचार सध्या देशात सुरू आहे. फॅसिस्ट विचारसरणीचा पुरस्कार करून पैसा कमावण्यासाठीच हे सगळं सुरू आहे. हिंदु धर्म अगदी शेकडो वर्षांच्या मुस्लीम आणि ख्रिश्चन राजवटींमध्ये देखील धोक्यात नव्हता”, असं ते म्हणाले.