‘लष्करप्रमुख म्हणजे रस्त्यावरचे गुंड’ हे काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांचे वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडले आहे. कोणत्याही राजकारण्याने देशाच्लया लष्करप्रमुखांबाबत असे उच्चार काढणे ही शरमेची बाब आहे, असे म्हणत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दीक्षित यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. रविवारी काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर आणि काँग्रेस पक्षावर सोशल मीडियावर कडाडून टीका झाली. तसेच भाजपनेही काँग्रेस नेत्याच्या या वक्तव्यावर तिखट शब्दात टीका केली. ज्यानंतर अखेर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दीक्षित यांचे वक्तव्य चुकीचे असून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असे म्हटले आहे.

भाजप प्रवक्ते संबित पत्रा यांनी तर दीक्षित यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करावी अशीही मागणी केली आहे. तसेच त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागायला हवी अशी भूमिका घेतली आहे. पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी जेव्हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला, त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यासाठी ‘खून की दलाली’ सारखे शब्द वापरले. तर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले. एकंदरीतच काँग्रेसचे धोरणच भारतीय सैन्यदलाच्या विरोधात आहे, त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? अशी टीकाही पत्रा यांनी केली आहे.

काँग्रेसला पाकिस्तानी सैन्याचे मनोधैर्य वाढवायचे आहे असा आरोप भाजपचे नेते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी केला आहे. एखाद्या नेत्याच्या तोंडी अशी भाषा अजिबात शोभत नाही. काँग्रेसच्या नेत्यांकडून वारंवार अशी वक्तव्ये होत आहेत. त्यामुळे काँग्रेसने जाणीवपूर्वक हे धोरण स्वीकारलेले दिसते आहे, असेही राव यांनी म्हटले आहे. संदीप दीक्षित यांनी लष्करप्रमुखांबाबत केलेले वक्तव्य आता त्यांच्या अंगाशी आले आहे यात शंकाच नाही. त्यांच्या या वक्तव्या संदर्भात भाजपकडून टीका तर होतेच आहे, पण काँग्रेसनेही दीक्षित यांना झापले आहे.

Story img Loader