राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले आरोप उद्योगपती अनिल अंबानी यांनी फेटाळून लावले आहेत. राहुल गांधी यांनी आरोप केल्यानंतर काही तासात अनिल अंबानी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेस सत्याची मोडतोड करुन धादांत खोटं बोलत आहे. रिलायन्स ग्रुप आणि त्यांचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची बदनामी करण्यासाठी काँग्रेकडून चुकीची मोहिम राबवली जात आहे असे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डासूने रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेड प्रकल्पात गुंतवणूक करण्याआधीच २०१५ ते २०१७ दरम्यान नागपूरमधील मिहान येथे जमिनीच्या खरेदीसाठी पैसे देण्यात आले होते असे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून सांगण्यात आले आहे. देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका डोळयासमोर ठेऊन काँग्रेस या राजकीय लढाईत अनिल अंबानींना खेचत आहे असे कंपनीने म्हटले आहे.

राफेल डील प्रकरणात अनिल अंबनींकडे जमीन उपलब्ध असल्याने त्यांच्या रिलायन्स कंपनीशी हा करार करण्यात आल्याची बाब खोटी आहे. उलट डासू कंपनीच्या पैशातूनच अंबानींनी जमीन खरेदी केली, त्यासाठी डासूने काही लाख किंमतीच्या रिलायन्समध्ये तब्बल २८४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. या व्यवहारासाठी अनिल अंबानींना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ३० हजार कोटींचा फायदा करुन दिल्याचा आरोपही पुन्हा एकदा राहुल गांधींनी केला आहे.

राफेलच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी शुक्रवारी पुन्हा एकदा आक्रमक झालेले पहायला मिळाले. त्यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, राफेल डील प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हे प्रकरण साधे सरळ असून ते मोदी आणि अंबानींच्या पार्टनरशीपवर संपते. या प्रकरणात केवळ मोदी आणि अंबानी या दोघांनीच घोटाळा केला आहे.

अंबानींच्या रिलायन्स कंपनीची केवळ ८ लाख ३० हजार रुपयांची उलाढाल असताना या कंपनीत राफेलची निर्मिती करणाऱ्या डासू कंपनीने २८४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याबाबत डासूच्या सीईओंनी रिलायन्सकडे जमीन असल्याने त्यांच्याशी करार करण्यात आला तर हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडे पुरेशी जमीन नसल्याने त्यांना यात सहभागी करण्यात न आल्याचे सांगितले आहे. मात्र, हे खरं नसून उलट रिलायन्सने डासूच्या पैशातूनच जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे ही बाब संशयास्पद असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress distorting facts anil ambani