निवडणूक काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांतरं दिसून येतात हे काही देशाला नवीन नाही. मात्र, निवडणुका नसताना देखील पक्षांतरं घडतात. पंजाबमध्ये अशाच प्रकारे पक्षांतर झालं असून पक्षाचे माजी आमदार डॉ. मोहिंदर रिनवा यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून शिरोमणी अकाली दलामध्ये प्रवेश केला आहे. शिरोमणी अकाली दलचे प्रमुख सुखबिर सिंग बादल यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी त्यांनी पक्षप्रवेश केला. विशेष म्हणजे काँग्रेस पक्ष सध्या पंजाबमध्ये सत्तेत असून देखील सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने विरोधी पक्षात प्रवेश केल्यामुळे यावरून पंजाबच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मोहिंदर रिनवा यांनी पक्ष सोडण्याचं दिलेलं कारण हे काँग्रेसच्या जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे.
“काँग्रेसमध्ये कोंडी होत होती!”
काँग्रेसमध्ये आपली कोंडी होत होती, असं रिनवा म्हणाले आहेत. “काँग्रेसच्या पक्षव्यवस्थेमध्ये माझी कोंडी होत होती, मला गुदमरल्यासारखं वाटत होतं. तेव्हा मी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्ण घेतला. काँग्रेसमध्ये कुणीही नेत्याला किंमत देत नाही. खुद्द मुख्यमंत्री देखील तुमच्या फोन कॉलला उत्तर देत नाहीत. ते सत्तेत नसताना देखील पक्षातील कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध नसतात. इथे(शिरोमणी अकाली दल) सुखबीर सिंग बादल कधीही तुमचा फोनकॉल चुकवत नाहीत”, असं रिनवा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं आहे.
“लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानसुद्धा गायब”; राहुल गांधी यांची मोदींवर टीका
रिनवा हे याआधी दोन वेळा आमदार म्हणून पंजाबच्या विधानसभेवर निवडून गेले आहेत. यापैकी एकदा ते अपक्ष म्हणून तर एकदा काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेवर गेले आहेत. याआधी २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील रिनवा पक्षनेतृत्वावर नाराज झाले होते. त्यांना टाळून देविंदर सिंग घुबया यांना तिकीट दिल्यामुळे रिनवा संतप्त झाले होते. त्यांनी त्याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा देखील इशारा दिला होता. मात्र, नंतर त्यांची समजूत काढण्यात आली.