एकेकाळचे काँग्रेसचे जम्मू-काश्मीरमधील महत्त्वाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम ठोकून अवघे ४८ तास उलटले असताना आता पक्षाला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वावर टीका करत पक्षाच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, गुलाम नबी आझाद यांनी मांडलेल्या मुद्द्यांचाच पुनरुच्चार त्यांनी राजीनामा देताना केला आहे. राहुल गांधींची एक वेगळीच विचारसरणी असून ती पक्षाच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांनी जुळत नसल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“राहुल गांधी उपाध्यक्ष झाल्यापासून…”

तेलंगणामधील काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडत राजीनामा दिला आहे. राहुल गांधींमुळेच काँग्रेसमधली परिस्थिती बिघडल्याचा दावा त्यांनी केला आहे. “मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधींनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा कारभार सांभाळल्यापासून इथली परिस्थिती अधिकच खराब होत गेली आहे. राहुल गांधींकडे त्यांची अशी एक वेगळीच विचारसरणी आहे. पण ती विचारसरणी पक्षातल्या ब्लॉक पातळीपासून बूथ पातळीपर्यंत कुणाशीच जुळत नाही”, असा घणाघात खान यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

“राहुल गांधींना हे माहितीच नाही की…”

दरम्यान, राहुल गांधींना ज्येष्ठांशी कसं वागावं, हे माहित नसल्याची टीका खान यांनी केली. “राहुल गांधींच्या या धोरणाचा परिणाम म्हणून आज काँग्रेसची वाताहत झाली आहे. पक्ष अशा पातळीला येऊन पोहोचला आहे, जिथे गेली अनेक दशकं पक्ष उभारणीचं काम केलेले ज्येष्ठ नेतेच पक्षाला सोडून जात आहेत. ज्येष्ठांशी कसं वागायचं, हे राहुल गांधींना माहिती नाही”, असं एम. ए. खान म्हणाले आहेत.

गुलाम नबी आझाद स्वत:चा पक्ष करणार स्थापन, काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताच मोठी घोषणा

नुकताच गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. “राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि खासकरुन जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर याआधी असलेली सल्लागार यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आली असा आरोप त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात केल आहे. तसंच पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारुन कोणताही अनुभव नसणारे पक्षाचं कामकाज चालवू लागले असंही ते म्हणाले आहेत. राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला हे फारच बालिशपणाचं होतं अशी टीका करताना २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवात याचा मोठा वाटा होता असा दावा त्यांनी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ex mp m a khan resigned targeting rahul gandhi after gulam nabi azad pmw