गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. आधी आचार्य प्रमोद कृष्णम यांच्याकडून सातत्याने काँग्रेसच्या धोरणांवर जाहीरपणे टीका केली जात होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेविरोधात अयोध्येतील सोहळ्याला उपस्थिती लावली. मग थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना कलकी धामच्या भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण दिलं. या पार्श्वभूमीवर पक्षविरोधी कारवायांचं कारण देत काँग्रेसनं आचार्य प्रमोद कृष्णम यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. या पार्श्वभूमीवर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पक्षावर परखड प्रश्न उपस्थित केले असून आता थेट प्रियांका गांधींचं नाव घेऊन मोठा दावा केला आहे.
आचार्य प्रमोद कृष्णम यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर टीका केली होती. “माझ्या कोणत्या कारवाया पक्षविरोधी होत्या? या कारवायांबाबत त्यांना कधी समजलं? प्रभू श्रीरामाचं नाव घेणं पक्षविरोधी आहे का? अयोध्येला जाणं पक्षविरोधी आहे का? राम जन्मभूमीवर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती लावणं पक्षविरोधी आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणं पक्षविरोधी आहे का?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. तसेच, “मला काँग्रेसमधून मुक्त केल्याबद्दल धन्यवाद”, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली होती.
“सचिन पायलट यांनी सगळं विष पचवलं”
सचिन पायलट यांचा काँग्रेसमध्ये सातत्याने अपमान झाल्याचा दावा आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे. “सचिन पायलट यांचा काँग्रेसमध्ये खूप अपमान झाला आहे. पण प्रभू शंकराप्रमाणे ते सगळं विष पिऊन काम करत होते”, असं आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले. यावेळी त्यांनी प्रियांका गांधींचाही काँग्रेसमध्ये अपमान होत असून तो कोण करतंय? असा सूचक सवाल केला.
“प्रियांका गांधी यांचाही खूप अपमान होत आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर झाली. त्यावेळी देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कुठल्याच पदाधिकाऱ्याच्या नावासमोर असं लिहिलं गेलं नाही जे प्रियांका गांधींच्या नावासमोर लिहिलं गेलं. तुम्ही प्रियांका गांधींना विचारा की त्यांना हा निर्णय मान्य होता का?” असा प्रश्न आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उपस्थित केला आहे.
“जनरल सेक्रेटरी विदाऊट एनी पोर्टफोलिओ”
दरम्यान, प्रियांका गांधींना जनरल सेक्रेटरी करूनही त्यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आली नव्हती, असं आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले. “प्रियांका गांधींच्या नावासमोर लिहिलं होतं ‘जनरल सेक्रेटरी विदाऊट एनी पोर्टफोलिओ’. याचा अर्थ तुम्ही जनरल सेक्रेटरी आहात पण काही काम करणार नाही. प्रियांका गांधींना विचारा की राहुल गांधींची यात्रा दीड महिन्यापासून चालू आहे, त्यात प्रियांका गांधी का जात नाहीयेत? प्रश्न हा आहे की हा जो काही त्यांचा आणि इतरांचा अपमान होत आहे, तो कुणाच्या इशाऱ्यावर होतोय? कारण आपले अध्यक्ष तर रबर स्टॅम्प आहेत”, असं सूचक विधान आचार्य प्रमोद कृष्णम यांनी यावेळी केलं.
“काँग्रेस पक्षाकडून असे अनेक निर्णय घेतले गेले जे मला मान्य नव्हते. उदाहरणार्थ कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला विरोध करणं. काँग्रेसनं हा विरोध करायला नको होता. ज्या द्रमुकनं सनातन धर्माची तुलना डेंग्यु आणि मलेरियाशी केली, त्या द्रमुकला काँग्रेसनं समर्थन द्यायला नको होतं”, असंही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी नमूद केलं.