उत्तर प्रदेशमधील ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांना शनिवारी काँग्रेसनं ६ वर्षांसाठी निलंबित केल्याचं जाहीर केलं. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आचार्य यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन उत्तर प्रदेशातील कलकी धामच्या भूमिपूजनासाठी आमंत्रित केलं. या भेटीनंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुकही केलं. या पार्श्वभूमीवर आचार्य कृष्णम यांच्यावर कारवाईची चर्चा केली जात असतानाच त्यांच्या हकालपट्टीची घोषणा पक्षाकडून करण्यात आली. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आचार्य यांनी काँग्रेस नेतृत्वालाच उलट प्रश्न केला आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काँग्रेसनं न जाण्याचा निर्णय जाहीर केला असतानाही आचार्य प्रमोद कृष्णम या सोहळ्याला उपस्थित होते. मात्र, त्याचवेळी राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेला मात्र ते गेले नाहीत. त्यामुळे त्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. त्यातच त्यांनी कलकी धाम भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केल्यानंतर या चर्चांना अधिकच बळ मिळालं. अखेर शनिवारी त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं पत्रक पक्षाकडून काढण्यात आलं
“माझ्या कोणत्या कारवाया पक्षविरोधी ठरल्या?”
“माझ्या कोणत्या कारवाया पक्षविरोधी होत्या? या कारवायांबाबत त्यांना कधी समजलं? प्रभू श्रीरामाचं नाव घेणं पक्षविरोधी आहे का? अयोध्येला जाणं पक्षविरोधी आहे का? राम जन्मभूमीवर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती लावणं पक्षविरोधी आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणं पक्षविरोधी आहे का?” असे सवाल आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उपस्थित केले आहेत.
“मी काँग्रेसचे आभार मानेन की त्यांनी मला पक्षातून मुक्त केलं”, अशी खोचक टिप्पणीही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी यावेळी केली.
काँग्रेसचे आचार्य प्रमोद कृष्णम भाजपाच्या वाटेवर?
२०१९ मध्ये लखनौमधून पराभव
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर लखनौमधून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. प्रियांका गांधी वाड्रा यांना सल्ला देण्याची जबाबदारी असणाऱ्या उत्तर प्रदेश सल्लागार परिषदेत आचार्य प्रमोद कृष्णम यांचा समावेश होता. इंडिया आघाडीत काँग्रेस व सपा एकत्र असल्यामुळे लखनौची जागा सपाला सोडली जाणार असल्याचं बोललं जात आहे. आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या कृतीमागे ही पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे.