पक्षांतर न करण्याची ईश्वरसाक्
उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर
गोवा विधानसभेच्या निवडणुका महिनाभरावर येऊन ठेपल्या असतानाच; या भाजपशासित राज्यात गेल्या पाच वर्षांत पक्षांतराचा सर्वाधिक फटका बसलेल्या काँग्रेसने आपल्या उमेदवारांना ‘निवडून आल्यास पक्षांतर करणार नाही’, अशी शपथ ईश्वरापुढे घ्यायला लावली आहे.
काँग्रेसने शनिवारी आपल्या सर्व ३४ उमेदवारांना शनिवारी एका विशेष बसने पणजीतील मंदिर, बांबोलिम येथील एक चर्च आणि पणजीनजीकच्या बेतिम खेडय़ातील एका दग्र्यात नेले आणि त्यांना ‘पक्षांतरविरोधी शपथ’ घ्यायला लावली. काँग्रेसचे गोव्यासाठीचे प्रभारी असलेले ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम हे या धार्मिक स्थळी उमेदवारांसोबत होते.
गेल्या निवडणुकीपासून काँग्रेसचे बहुतांश आमदार पक्ष सोडून गेले आहेत. २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत ४० सदस्यांच्या सभागृहात १७ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसकडे आता फक्त दोन आमदार आहेत. २०१९ साली काँग्रेसच्या १० आमदारांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे भाजपचे सभागृहातील सध्याचे संख्याबळ २७ आहे.
‘लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी, उमेदवारांना ईश्वरापुढे शपथ घेण्याचा प्रयोग करण्यात आला’, असे गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
मात्र असा प्रयोग करणारा काँग्रेस हा राज्यातील पहिला पक्ष नाही. गेल्या वर्षी ३१ जानेवारीला गोवा फॉर्वर्ड पार्टीने (जीएफपी) त्यांचे तिन्ही आमदार व पदाधिकारी यांना मापुसा येथील देव बोडगेश्वर मंदिरात नेऊन, आपण २०२२ सालच्या निवडणुकांत भाजपला पाठिंबा देणार नाही अशी शपथ घ्यायला लावली होती. मात्र अशी शपथ घेऊनही जयेश साळगावकर या आमदाराने नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते सालिगाव मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत.