नवी दिल्ली : अदानी समूहाच्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात अमेरिकेतील ‘हिंडनबर्ग रिसर्च’ या संस्थेच्या अहवालानंतर, काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तीव्र टीका केली असून भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) आणि स्टेट बँकेतील मध्यमवर्गाच्या बचतीला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली आहे. अदानी समूहाच्या शेअर बाजारातील कथित ‘हस्तक्षेपा’ची रिझव्र्ह बँक व ‘सेबी’कडून तातडीने चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
अदानी समूह हा काही सामान्य उद्योग समूह नसून पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून समूहाचे मालक गौतम अदानी यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. काळा पैसा नष्ट करण्याची ग्वाही देणारे केंद्रातील मोदी सरकार आपल्या आवडत्या उद्योग समूहाच्या आर्थिक गैरकृत्यांकडे डोळेझाक करणार का? ‘हिंडनबर्ग रिसर्च’च्या अहवालातील आरोपांची ‘सेबी’ नावापुरती नव्हे तर, खरोखर चौकशी करेल का, असा उपरोधिक प्रश्न काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी केला आहे.
खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी अदानी समूहामध्ये गुंतवणूक करण्याचे टाळले. मात्र, ‘एलआयसी’ने ७४ हजार कोटी इतकी प्रचंड रक्कम अदानी समूहामध्ये गुंतवली. त्यांची दुसरी सर्वात मोठी गुंतवणूक आहे. अदानी समूहाला सरकारी बँकांनी खासगी बँकांच्या तुलनेत दुप्पट कर्ज दिले असून एकूण कर्जापैकी एकटय़ा स्टेट बँकेने ४० टक्के कर्ज दिले आहे. या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मध्यवर्गीयांचे पैसे असून अदानी समूहाच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे मध्यमवर्गाची बचत धोक्यात येऊ शकते, अशी भीती रमेश यांनी व्यक्त केली आहे.
अदानी समूहाने करसवलत देणाऱ्या देशांमध्ये बनावट कंपन्या स्थापन करून देशातील शेअर बाजारात पैसे गुंतवले. शेअर बाजारातील ‘हस्तक्षेपा’तून कंपनीच्या समभागांचे दर वाढवत नेले. कंपनीचे बाजारमूल्य कृत्रिमरित्या वाढवून बँकांकडून कर्जे घेतली. अदानी समूहाने गैरव्यवहार केला असल्याचा अहवाल ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने दिला. या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांचे दर गडगडले असून बाजारमूल्य घसरल्यामुळे समूहाला आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने समूहाची बदनामी केली असून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यावर, ‘हिंडनबर्ग रिसर्च’ ही अमेरिकेतील संस्था असून तिथलया न्यायालयात अदानी समूहाने खटला भरावा, असे आव्हान संस्थेने दिले आहे.
विमानतळ कंपनीच्या चौकशीचे काय झाले?
गेल्या काही वर्षांत अदानी समूहाने बंदरे आणि विमानतळांमध्ये मोठी गुंतवणूक करून मक्तेदारी निर्माण केली आहे. वीज, रस्ते, रेल्वे, ऊर्जा आणि प्रसारमाध्यमे असा विविध क्षेत्रांमध्ये ते प्रभावशाली बनले आहेत. अदानी समूहाचे आर्थिक व्यवहार हे गोतावळय़ाच्या भांडवलशाहीचे सर्वात गंभीर प्रकरण आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तत्कालीन संचालक कंपनीवर सक्तवसुली संचालनालय (ईडी) व केंद्रीय अन्वेषण संस्थेने (सीबीआय) छापा टाकल्यावर या कंपनीने महिन्याभरात विमानतळाचे व्यवस्थापन अदानी समूहाकडे सुपूर्द केले. त्यानंतर तपास यंत्रणांच्या चौकशीचे काय झाले हे रहस्य आहे, अशी टीकाही रमेश यांनी केली.