यवतमाळ विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार नंदिनी नीलेश पारवेकर यांना सहानुभूतीच्या जोरावर विजय मिळविण्याची आशा असली तरी या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ‘सहानुभूती’ कुणाला मिळेल, यावर काँग्रेस पक्ष बारकाईने लक्ष ठेवून आहे.
नीलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनानंतर नंदिनी पारवेकर यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने ही पोटनिवडणूकजिंकण्यासाठी सहानुभूतीचे कार्ड खेळले आहे. पण आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कोणती खेळी करतो, याची काँग्रेसला अधिक चिंता आहे. या पोटनिवडणुकीत विदर्भातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधांची कसोटी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.
विदर्भात काँग्रेसचा जमेल तितका सफाया करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची सहानुभूती भाजपच्या पाठीशी असल्याचे या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना लक्षात आले आहे. काँग्रेससोबत आघाडी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला छुपी मदत करण्याची रणनीती आखली असून या प्रयोगाची सुरुवात यवतमाळच्या पोटनिवडणुकीपासून होणार असल्याबद्दल काँँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीतील काँग्रेसश्रेष्ठींच्या, विशेषत: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सतर्क केले आहे. विदर्भात होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जास्तीत जास्त उमेदवारांना पाडून भाजपला मदत करायची आणि राज्यातील अन्य भागांमध्ये भाजपकडून राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी सहकार्य मिळवायचे, अशी राष्ट्रवादीची नीती असल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. राष्ट्रवादीच्या या छुप्या चालीमुळेच यवतमाळची पोटनिवडणूक अवघड ठरणार असल्याचे मत या नेत्याने व्यक्त केले. विदर्भात अलीकडच्या काळात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने भाजपला अशाच पद्धतीने मदत केली होती, याकडेही या नेत्याने लक्ष वेधले. राष्ट्रवादीचे मनसुबे निदर्शनाला आणून दिल्यानंतर दिल्लीतील काँग्रेसश्रेष्ठी आणि राहुल गांधी काय करतात, याकडेही प्रदेश काँग्रेसचे लक्ष लागलेले आहे.