भाजपचे धर्मवादी राजकारण रोखण्यास काँग्रेस अपुरी पडत आहे. ती त्यांना योग्य प्रत्युत्तर देऊ शकत नाही. म्हणूनच धर्मनिरपेक्ष विचारांची आघाडी उभी करणे आवश्यक आहे, अशी भूमिका भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय पातळीवरील पर्यायी राजकीय आघाडी उभी करू पाहणाऱ्या नेत्यांच्या बैठकीत मांडली. महाराष्ट्रातही अशीच आघाडी उभी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत भारिपशी युती करण्याची तयारी दर्शविली असतानाही प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय पातळीवर उभ्या राहू पाहणाऱ्या तिसऱ्या आघाडीत सहभागी झाले आहेत. दिल्लीत बुधवारी यासंदर्भात झालेल्या बैठकीला नितीशकुमार, शरद यादव, अखिलेश यादव, ए.बी.वर्धन, सीताराम येचुरी, देवेगौडा आदींसह प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.
भाजपने धर्मवादी राजकारणाची भूमिका घेऊन या देशाची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न चालविला आहे. धर्मनिरपेक्ष आघाडी उभारून त्याला प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे मत आंबेडकर यांनी या बैठकीत मांडले. भाजपला लोकशाही मान्य नाही. त्यांना देशात अध्यक्षीय पद्धती आणायची आहे, धर्माधारित राजकारण करायचे आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय राज्यघटना, राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र ही प्रतिकेही भाजपला मान्य नाहीत. आता त्यांची भूमिका वरकरणी मुस्लिम समाजाविरोधी असली तरी, शीख, बौद्ध, ख्रिस्ती, पारशी, जैन आदी सर्वच अल्पसंख्याक समाजाला वेगळे पाडण्याचा त्यांचा हेतू आहे. हे सारे मुद्दे घेऊन भाजपच्या विरोधात मैदानात उतरले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
या धर्मवादी राजकारणाला काँग्रेस नीट प्रत्युत्तर देऊ शकत नाही. म्हणूनच देशपातळीवर धर्मनिरपेक्ष विचारांची आघाडी हवी. महाराष्ट्रतही तशी आघाडी उभी केली जाईल, असे आंबेडकर म्हणाले.

Story img Loader