काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “काँग्रेस नेत्यांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना मी फक्त रायफलने प्रत्युत्तर दिले आहे.” गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील भदरवाह येथे एका सभेला संबोधित करताना हे विधान केलं आहे.

जाहीर सभेला संबोधित करताना माजी केंद्रीयमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला, “त्यांनी माझ्यावर क्षेपणास्त्रे डागली, मी फक्त 303 रायफल्सने प्रत्युत्तर दिले आणि त्यांना नष्ट केले. मी जर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र वापरले असते तर मग काँग्रेस अजिबात दिसली नसती.” असे त्यांनी म्हटले.

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गुलाम नबी आझाद स्वत:चा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत पक्षाचा नवा कार्यकर्ता तयार करण्यासाठी आझाद आपले होम ग्राउंड भदरवाह येथे पोहोचले होते. यादरम्यान त्यांनी एका मोठ्या रॅलीलाही संबोधित केले. आझाद म्हणाले, “मी ५२ वर्षांपासून पक्षाचा (काँग्रेस) सदस्य होतो आणि राजीव गांधींना माझा भाऊ आणि इंदिरा गांधींना माझी आई मानतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शब्द वापरण्याची माझी इच्छा नाही.”

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर जम्मूमध्ये त्यांच्या पहिल्या जाहीर सभेला गुरुवारी संबोधित केले. यावेळी आझाद यांनी घोषणा केली की ते स्वतःची राजकीय संघटना सुरू करतील, जी पूर्ण राज्याचा दर्जा मिळवण्यावर लक्ष केंद्रित करेल.

ते म्हणाले की, मी अद्याप माझ्या पक्षाचे नाव निश्चित केलेले नाही. यासाठी मी जम्मू-काश्मीरमधील लोकांकडून सूचना घेईन. हे लोक पक्षाचे नाव आणि झेंडा ठरवतील. प्रत्येकाला समजेल असे हिंदुस्थानी नाव मी माझ्या पक्षाला देईन. २००५-२००८ दरम्यान जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री राहिलेले गुलाम नबी आझाद यांनी २६ ऑगस्ट रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला होता.

Story img Loader