Congress First List of Candidates For Haryana Poll : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत काँग्रेसने ३१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीनुसार काँग्रेसने विनेश फोगाटला जुलाना मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर लाडवा मतदारसंघातून काँग्रेसने मेवा सिंह यांना तिकीट दिलं आहे. त्यांची थेट लढत मुख्यमंत्री नायब सैनी यांच्याशी होणार आहे. माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांना गढी सांपला-किलोई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदयभान यांना होडल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
दिल्लीतील बैठकीत ३१ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीचं सत्र सुरू होतं. आजही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या नेतृत्वात दिल्लीत बैठक पडली. या बैठकीत विनेश फोगाट सह ३१ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या बैठकीला काँग्रेस अध्यक्षांसह काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, भूपेंद्र सिंह हुड्डा तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे विनेश फोगाटने आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
जागावाटपावरून काँग्रेस-आपमध्ये मतभेद
एकीकडे काँग्रेसने ३१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असली, तरी दुसरीकडे इंडिया आघाडीतील आप आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपासून मतभेद असल्याचं पुढे आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आम आदमी पक्षाने हरियाणात ७ जागांची मागणी केली आहे. मात्र, काँग्रेस आपला केवळ तीन-चार जागा देण्यास तयार आहे. याशिवाय काँग्रेसने आपला ज्या जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्या शहरी भागातील जागा आहे, जिथे भाजपाच मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे आप आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपावरून एकमत होत नसल्याची माहिती आहे.
हरियाणात निवडणूक केव्हा?
हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या ९० जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. आधी ही तारीख १ ऑक्टोबर घोषित करण्यात आली होती. मात्र, नंतर ही तारीख बदलण्यात आली आहे. याशिवाय ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणीही होणार आहे.