पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने भाजपाचे तगडे आव्हान समोर असणार आहे. हीच बाब ध्यानात घेऊन काँग्रेसने आतापासूनच २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी काँग्रेसने शनिवारी तीन महत्वाच्या समित्या स्थापन केल्या.
आपसात समन्वय, प्रसिद्धी आणि जाहीरनाम्याची जबाबदारी या समित्यांकडे असेल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नऊ जणांची विशेष कोअर समिती बनवली आहे. ए.के.अँटनी, गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम, अशोक गेहलोक, मल्लिकार्जून खर्गे, अहमद पटेल, जयराम रमेश, रणदीप सूरजेवाला आणि के.सी.वेणूगोपाल या दिग्गज काँग्रेस नेत्यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे.
१९ जणांच्या जाहीरनामा समितीवर लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा तयार करण्याची जबाबदारी असेल. राहुल गांधी यांनी प्रसिद्धीसाठी १९ नेत्यांची समिती बनवली आहे. या समितीचे निवडणूक काळातील प्रसिद्धीवर लक्ष असेल. पक्षाचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी तीन समित्या स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली.