दोन वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. उच्चशिक्षितांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने ‘ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस’ ची स्थापना केली आहे. देशातील राजकारणात आणि धोरण आखताना प्रोफेशनल तरुणांचाही विचार होणे गरजेचे असून जास्तीत जास्त तरुणांनी यात सामील व्हावे असे आवाहन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.
उच्चशिक्षित तरुणांना डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसची स्थापना केली असून शशी थरुर आणि अन्य नेत्यांच्या पुढाकाराने प्रोफेशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली आहे. ‘तुम्ही हुशार असाल आणि राजकारणात रस असेल तर तुम्ही ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसमध्ये सामील व्हा असे आवाहन काँग्रेसने केले आहे. प्रोफेशनल काँग्रेसमध्ये तुम्ही केलेले काम थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवले जाईल असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. समान विचारधारा असलेल्या मंडळींना एकत्र आणून त्यांना वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्याची संधी दिली जाणार आहे. काँग्रेससाठी प्रचार मोहीमेची आखणी, धोरण तयार करणे तसेच जाहिरनामा तयार करण्याचे काम ‘प्रोफेशनल काँग्रेस’ करणार आहे. शशी थरुर प्रोफेशनल काँग्रेसचे प्रमुख असतील.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही यावर भाष्य केले. ‘आम्ही प्रोफेशनल काँग्रेसची स्थापना केली आहे. देशातील राजकारणात आणि धोरण आखताना त्यांचा आवाज ऐकून घेणार आहोत. जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेच्या ‘मन की बात’ न ऐकता स्वत:च्या ‘मन की बात’ देशावर लादतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. मोदी केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चर्चा करुन देश चालवत आहेत असा आरोप त्यांनी केला.