काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांनी राजस्थानच्या जयपूरच्या जागेवरून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. वय तसेच आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.
२००६ सालापासून अमेठी मतदारसंघातून खासदार
सोनिया गांधी या २००६ सालापासून रायबरेली या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होत्या. २०१९ साली मोदी लाट असतानाही त्यांनी या मतदारसंघात विजयी कामगिरी केली होती. याच निवडणुकीत गांधी घरण्याशी संबंधित असलेल्या उत्तर प्रदेशमधील अमेठी या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा २०१९ सालच्या निवडणुकीत पराभव झाला होता.
५६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान
दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे राजस्थानमधूनच राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघात कोणत्या काँग्रेस नेत्याला उमेदवारी मिळते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.
कोणत्या राज्यांत किती जागा?
१३ राज्यातील ५६ राज्यसभा जागांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरयाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखड १, पश्चिम बंगाल ५, ओडिसा २, राजस्थान ३ अशा एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.