प्रसार माध्यमे आणि वृत्तपत्रांतून काँग्रेस पक्ष आणि सरकारची निव्वळ बदनामी आणि नकारात्मक प्रचार होत असल्याच्या भावनेतून सरकारच्या धोरणांचे सकारात्मक चित्र मांडण्याचे माध्यम म्हणून काँग्रेस पक्षाने बुधवारी वकील, डॉक्टर, प्राध्यापक आणि विचारवंतांचा मेळावा भरवला. पक्षाच्या ‘विचार विभागा’तर्फे त्याचे आयोजन केले गेले.
प्रसिद्धी माध्यमांना केवळ नकारात्मक बातम्याच पसरविण्यात रस असतो. वृत्तपत्रांतूनही लोकांना वाईट बाजूच केवळ प्रकर्षांने वाचायला मिळते. सरकार अनेक चांगल्या गोष्टी करीत आहे, त्या मांडण्यात कुणालाच रस नसतो. त्यामुळेच त्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने हा मेळावा आम्ही घेतला, असे केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पत्रकारांना सांगितले.
या पद्धतीचा हा पहिलाच मेळावा नव्हता, असा दावा करताना सिब्बल म्हणाले की, तुम्ही आमच्याशी सहकार्य कराल, अशी आमची अपेक्षा होती. गेली चार वर्षे आम्ही वाट पाहिली पण तुमचा थंडा प्रतिसाद लक्षात घेऊन आता आम्ही या मेळाव्यासारखे अनेक पर्याय हाताळणार आहोत.
देशाचे भवितव्य सुरक्षित असावे, हा काँग्रेस पक्षाचा एकमात्र उद्देश आहे. अनेक पत्रकारांना मात्र त्याची जाणही नाही. तुमच्यापैकी कित्येकांना केवळ वाईट बातम्यांतच रस आहे. पत्रकारांनी देशाची चांगली प्रतिमा जगासमोर आणली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेसच्या ‘विचार विभागा’च्या प्रमुख गिरिजा व्यास म्हणाल्या की, देशातील सामान्य माणूस काँग्रेसलाच मत देत असला तरी काँग्रेसची विपरीत प्रतिमा मांडली जात आहे. लोकांची दिशाभूल होऊ नये यासाठी या मेळाव्यासारखे अनेक उपक्रम आम्ही हाती घेत आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा