तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या एका विधानाची गेल्या दोन दिवसांपासून जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. उदयनिधी यांनी सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांशी तुलना करून त्याचं समूळ उच्चाटन करण्याची भूमिका मांडली आहे. त्यांच्या या विधानावरून सत्ताधारी भाजपा व मित्रपक्षांनी थेट इंडिया आघाडीला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे काँग्रेसकडून मात्र सावध भूमिका घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानावर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पक्षाची सविस्तर भूमिका मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले होते उदयनिधी?

“सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ कत नाही. त्यांचं उच्चाटनच केलं जायला हव. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असं विधान उदयनिधी यांनी केलं होतं. त्यापाठोपाठ “मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, त्यांनी माझ्यावर हवे ते गुन्हे दाखल करावेत”, असंही त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.

“काही लोक बालिश…”, सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी तुलना केल्यानंतर स्टॅलिनपुत्र उदयनिधींचं स्पष्टीकरण!

उदयनिधींच्या या विधानावरून भाजपाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर टीका करताना “ही आघाडी भारताची संस्कृती, इतिहास व सनातन धर्माचा अपमान करत आहे”, अशा शब्दांत त्यांनी भूमिका मांडली.

काँग्रेसची भूमिका

दरम्यान, यासंदर्भात दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “आमची भूमिका स्पष्ट आहे. सर्वधर्म समभाव. पण प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही प्रत्येकाच्या भूमिकांचा सन्मान करतो”, असं के. सी. वेणुगोपाल म्हणाले. यासंदर्भात कर्नाटकमधील काँग्रेसचे मंत्री प्रियांक खरगे यांनी बंगळुरूमध्ये बोलताना “लोकांना समानतेने न वागवणारा कोणताही धर्म हा एखाद्या आजारापेक्षा कमी नाही”, असं म्हणाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवरही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress general secretory k c venugopal rao on udayanidhi stalin controversial statement pmw