Congress Donation in 2023-24 : भारतीय जनता पार्टीला २०२३-२४ मध्ये हजारो कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. भाजपाला तब्बल ३,९६७.१४ कोटी रुपये देणगी स्वरुपात मिळाले आहेत. भाजपाच्या २०२३-२४ च्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालातून (ऑडिट) ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केलेल्या वार्षिक अहवालानुसार भारतीय जनता पार्टीला २०२२-२३ मध्ये २,१२०.०६ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. २०२३-२४ मध्ये या देणग्या जवळपास दुप्पट झाल्या आहेत. भाजपासह इतर पक्षांना मिळालेल्या देणग्यांची माहिती देखील समोर आली आहे. या अहवालानुसार, सर्वाधिक देणग्या मिळालेल्या पक्षांमध्ये भाजपानंतर काँग्रेस दुसऱ्या नंबरवर आहे. काँग्रेसला २०२३-२४ मध्ये १,१२९ कोटी रुपये देणगी स्वरुपात मिळाले आहेत. २०२२-२३ च्या तुलनेत यात तब्बल ३२० टक्के वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये भाजपाला २६८ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसला मिलालेल्या एकूण देणग्यांपैकी ७३ टक्के हिस्सा हा निवडणूक रोख्यांचा आहे. म्हणजेच काँग्रेसला ८२८.३६ कोटी रुपये हे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळाले आहेत. २०२२-२३ मध्ये या पक्षाला १७१.०२ कोटी रुपये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळाले होते. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा निवडणुकीवरील खर्च देखील वाढला आहे. काँग्रेसने २०२२-२३ मध्ये निवडणुकींवर १९२.५५ कोटी रुपये खर्च केले होते. तर २०२३-२४ मध्ये काँग्रेसने निवडणुकीवर ६१९.६७ कोटी रुपये खर्च केले.

निवडणूक रोखे योजनेशिवाय भाजपा मालामाल

लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना रद्द केली होती. २०२३-२४ हे निवडणूक रोखे योजनेचं अखेरचं वर्ष होतं. या वर्षापर्यंत सर्वच पक्षांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देणग्या स्वीकारल्या. या योजनेचा सर्वाधिक फायदा भाजपालाच मिळाला आहे. एप्रिल २०१९ पासून ही योजना रद्द होईपर्यंत निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपाला ६,०६० कोटी रुपये मिळाले. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील सर्व पक्षांना मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी अर्धा हिस्सा एकट्या भाजपाचा होता. तर, काँग्रेस व तृणमूल काँग्रेसला या योजनेच्या माध्यमातून एक हजार कोटींहून अधिक पैसे मिळाले होते. तृणमूलला १,६०९ कोटी आणि काँग्रेसला १,४२१ कोटी रुपये मिळाले होते.

भाजपाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून १,६८५.६२ कोटी रुपये मिळाले आहेत. भाजपाला मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी ४३ टक्के हिस्सेदारी निवडणूक रोख्यांची आहे. २०२२-२३ मध्ये भाजपाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून १२९४.१४ कोटी रुपये मिळाले होते. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress got 1129 crore by donations 73 percent share by electoral bond scheme asc