पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यावरून मोठी चर्चा देशाच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे ही चर्चा काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात देखील सुरू झाली असून बंडखोर जी-२३ गटाकडून पुन्हा एकदा पक्षनेतृत्व आणि पक्षातील बदलांविषयी उघड नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गटाचे सदस्य गुलाम नबी आझाद यांची भेट घेऊन गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांना देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आझाद यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचे सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
काँग्रेसला खोचक टोला?
पद्मभूषण मिळाल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी आपल्या कामाची कुणीतरी दखल घेतंय, हे पाहून आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पण यातून आझाद यांचा रोख थेट काँग्रेसवर असल्याचं बोललं जात आहे. “कुणीतरी माझ्या कामाची दखल घेतली हे पाहून आनंद झाला. जेव्हा देश किंवा सरकार एखाद्याच्या कामाची दखल घेतं, तेव्हा चांगलं वाटतं”, असं आझाद म्हणाले आहेत.
“माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण या काळात देखील मी कायमच लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. मग ते सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो किंवा मग अगदी जम्मू-काश्मीरचा माजी मुख्यमंत्री म्हणून असो”, असं देखील आझाद म्हणाले. “हे सगळं पाहाता केंद्र सरकारकडून आणि देशाच्या जनतेकडून मला पुरस्कार मिळाल्याचा आनंद होत आहे”, असं त्यांनी नमूद केलं.
यंदाच्या वर्षी एकूण ५ पद्मभूषण, १७ पद्मविभूषण आणि १०७ पद्मश्री पुरस्कर प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये गुलाम नबी आझाद आणि माकपचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य या दोन विरोधी पक्षातील नेत्यांचा समावेश होता.
काँग्रेस नेत्याचा आझाद यांना टोला
बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. त्यावरून देखील राजकारण रंगलं असून काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी आझाद यांना त्यावरून टोला लगावला आहे. “बुद्धदेव भट्टाचार्य यांनी योग्य निर्णय घेतला. त्यांना ‘आझाद’ व्हायचं होतं, ‘गुलाम’ नाही”, असा टोला रमेश यांनी लगावला आहे.