नवी दिल्ली : राजस्थानातील काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यावर पक्षातर्फे कारवाई केली जाऊ शकते असे संकेत राज्याचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा यांनी बुधवारी दिले. पायलट यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांबदल सहमत असलो तरी ते मांडण्याची पद्धत चुकीची होती असे ते म्हणाले. मंगळवारच्या उपोषणनाटय़ानंतर पायलट दिल्लीमध्ये गेले असून ते पक्षश्रेष्ठींना भेटण्याची शक्यता आहे.
रंधवा यांनी बुधवारी पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन राज्यातील सद्यस्थिती याविषयी माहिती दिली. त्यानंतर ते म्हणाले, की राज्यात यापूर्वी पक्षशिस्त मोडलेल्या घटना घडल्या आहेत. तेव्हाच कारवाई करायला हवी होती, पण यावेळी मात्र योग्य पाऊल उचलले जाईल. कोणत्या प्रकारची कारवाई केली जाईल हे रंधवा यांनी स्पष्ट केले नाही.
दरम्यान, राज्यातील मंगळवारच्या उपोषणनाटय़ानंतर सचिन पायलट बुधवारी नवी दिल्लीत पोहोचले. ते रंधवा आणि इतर राजकीय नेत्यांची भेट घेतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, त्याचा कोणत्याही नेत्यांशी भेटीचा कार्यक्रम नव्हता असे समजले. दुसरीकडे, मुख्यमंत्री अशोक गेहलोत जयपूरमध्ये म्हणाले, की राज्य सरकारसमोर महागाई हा एकच मुद्दा महत्त्वाचा आहे. पूर्वीच्या सरकारच्या कथित भ्रष्टाचाराचा तपास करताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने अधिकाऱ्यांवर छापे मारले होते, असे सांगून भ्रष्टाचाराविरोधात कोणतीही कारवाई न केल्याचा पायलट यांचा आरोप गेहलोत यांनी फेटाळला. भाजपबरोबर आमचे शत्रुत्व नाही केवळ वैचारिक मतभेद आहेत असे गेहलोत म्हणाले. इतर मुद्दय़ांवरून त्यांनी भाजपवर टीका केली.
मोदी यांचा गेहलोत यांना टोला
राजस्थानमध्ये राजकीय भांडण सुरू असूनही वंदे भारतच्या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना टोला लगावला. ‘गेहलोतजी यांचे मी विशेष आभार मानतो. राजकीय संघर्षांच्या दिवसांत ते अनेक संकटांतून जात आहेत, पण तरीही त्यांनी विकासकामांसाठी वेळ काढला’, असे मोदी म्हणाले.