चंडीगड :जे उच्चपदांवर आहेत, त्यांना (आपल्या तालावर नाचणारा) दुबळा मुख्यमंत्री असावा असे वाटते, असे विधान पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
काँग्रेसने केलेल्या दूरसर्वेक्षणात मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्याबाबत अनुकूलता दिसून आल्याने विधानसभा निवडणुकीत चन्नी यांनाच पक्षाचा चेहरा म्हणून समोर ठेवण्याचा काँग्रेसचा हेतू दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जाणाऱ्या सिद्धू यांचे वक्तव्य अर्थपूर्ण मानले जात आहे. ते अमृतसरमधील एका सभेत बोलत होते. सिद्धू यांनी एकप्रकारे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना लक्ष्य केल्याचे मानले जात असले तरी, त्यांच्या सल्लागाराने हा आरोप फेटाळला आहे.