सरदार पटेलांवरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात पडलेली ठिणगी दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत असून काँग्रेसने गुरुवारी या मुद्यावर नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. सरदार पटेलांवरून भारतीय जनता पक्षाने सुरू केलेले राजकारण केविलवाणे असल्याची टीका केंद्रीय मंत्री व्ही. नारायणसामी यांनी केली. तर मोदी पंतप्रधान झाल्यास देशात मानवी मूल्यांचे दमन होईल, असे अजय माकन म्हणाले.
काही दिवसांपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारताच्या पंतप्रधानांनी ‘सरदार पटेल हे धर्मनिरपेक्ष नेते होते’ असे विधान केले होते. सरदार एक लोहपुरुष होते आणि त्यांनी आपली कर्तव्ये चोख बजावली होती. असे असताना भाजप मात्र या मुद्दय़ाचे गलिच्छ राजकारण करीत आहे, अशी टीका नारायणसामी यांनी केली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात कोणतेही मतभेद नव्हते, उलट त्यांच्यात उत्तम समन्वय होता. असे असतानाही, या दोघांवरून केले जाणारे राजकारण अत्यंत केविलवाणे असल्याचे नारायणसामींनी म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेस व गांधी कुटुंबावर यथेच्छ तोंडसुख घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांना इतिहासाचा अभ्यास करण्याचा सल्ला काँग्रेसच्या प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख अजय माकन यांनी दिला आहे. पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माकन यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले. माकन म्हणाले की, देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. धर्माध शक्ती सक्रिय झाल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपविरोधात लिहिणाऱ्या अनेक पत्रकारांना धमक्या येत आहेत. सरदार पटेल यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध होता. या इतिहासाचा मोदींनी साधा उल्लेखही केला नाही. पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तीने इतिहासाची माहिती ठेवली पाहिजे. छ
‘मोदी हे तर पटेल यांच्या मुशीतील नेता’
थिरुवनंतपुरम : येत्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्याच्या भाजपच्या निर्णयाचे गुरुवारी विश्व हिंदू परिषदेने स्वागत केले आह़े तसेच मोदी यांना पूर्ण पाठिंबाही जाहीर केला. मोदी महान नेते असून ते जात, धर्म, भाषा यांच्या पलीकडे जाऊन देशात ऐक्य निर्माण करू शकतात़ देशाला आता सरदार पटेल यांच्याच धर्मनिरपेक्षतेची आवश्यकता आहे, असेही या वेळी विहिंपचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांनी सांगितल़े भाजप वगळता सर्व पक्ष देशाच्या विभाजनाला कारणीभूत होत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली़
काँग्रेसचा पराभव करण्याची गरज
कोळसा खाणवाटप घोटाळा हे यूपीए सरकारच्या भ्रष्टाचाराचे ताजे उदाहरण असून, असंख्य घोटाळे करून या सरकारने भ्रष्टाचाराचा विक्रमच केला आहे. समाजावादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल या पक्षांचा काँग्रेस सरकारला पाठिंबा असल्याने या सर्वाचा पराभव करण्याची गरज आहे.
नितीन गडकरी, भाजप नेते
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा