राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणातून देशाला दिशा देण्याचा संकल्प केला. मी त्यांचे आभार मानतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलण्यास सुरुवात केली. तसंच त्यांनी त्यांनतर काँग्रेसवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. मी पंतप्रधान म्हणून सगळ्या सदस्यांचे आभार मानतो असंही म्हटलं आहे.
संसदेत काही लोक कडवटच बोलतात
राज्यसभेत काही सदस्य आहेत जे कायम कडवट बोलणं, टीका करणं इतकंच करत होते. मी त्यांच्याविषयीही संवेदना व्यक्त करतो असा टोला मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच लगावला. त्यानंतर पंतप्रधान म्हणाले, “आज मी मल्लिकार्जुन खरगेंचे विशेष आभार मानतो. आज त्यांचं भाषण मी काळजीपूर्वक ऐकलं. त्यांचं भाषण ऐकून मला खूप आनंद झाला. सध्या ते वेगळ्या ड्युटीवर आहेत, ज्यामुळे लोकसभेत चांगलं मनोरंजन होतं. मला आनंद या गोष्टीचा झाला की मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रदीर्घ भाषण केलं. त्यावर मी विचार केला की इतकं बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालं कसं? त्यादिवशी दोन स्पेशल कमांडर नव्हते. त्यामुळे स्वतंत्रतेचा बराच फायदा खरगेंनी घेतला. ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा असं खरगेंना वाटलं असेल. त्यामुळे ते इतका वेळ बोलले. अंपायर नव्हता, कमांडो नव्हते त्यामुळे ते षटकार, चौकार मिळेल. त्यांनी ४०० जागांसाठी जो आशीर्वाद एनडीएला दिला त्याचा मला खूप आनंद झाला. हा आशीर्वाद तुम्हाला परत घ्यायचा असेल तर घेऊ शकता. पण तुमचा आशीर्वाद मी शिरसावंद्य मानतो” असा टोला मोदी यांनी लगावला.
हे पण वाचा- “काँग्रेसवर ब्रिटिशांचा प्रभाव म्हणूनच देशाला स्वातंत्र्य मिळूनही गुलामगिरी…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप
माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही
मला गेल्या वर्षीचं अधिवेशन आठवतं आहे. आपण त्या जुन्या सदनात बसत होतो. त्यावेळी देशाच्या पंतप्रधानाचा म्हणजेच माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला होता. आम्ही त्यांचं म्हणणं खूप काळजीपूर्वक ऐकलं होतं. आज मी बोलतो आहे तेव्हाही हे लोक ऐकायचं नाही या मानसिकेतून आले आहेत. मात्र माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. माझ्या आवाजामागे देशाच्या जनतेची ताकद आहे. मी पण सगळ्या तयारीत आलो आहे. खरगेंसारखे लोक आले तर मर्यादेचं पालन होईल असं वाटलं होतं. मात्र माझ्यावर वाट्टेल ते आरोप झाले. तरीही मी मर्यादा सोडली नाही.
माझी आशा आहे की
पश्चिम बंगालहून जे आव्हान तुम्हाला मिळालं आहे ते आव्हान आहे काँग्रेस ४० जागाही जिंकणार नाही. मी प्रार्थना करतो की काँग्रेसला ४० जागा वाचवता आल्या पाहिजेत. आम्हाला खूप ऐकवलं गेलं. विरोधक जे बोलले ते ऐकलं कारण तो त्यांचा अधिकार आहे आणि आमची जबाबदारी ऐकण्याची आहे. असंही मोदी म्हणाले. मी तिकडेही ऐकलं आणि इकडेही ऐकलं मला लक्षात आलं की काँग्रेस पक्ष आऊटडेटेड झाला आहे. पाहता पाहता देशावर इतकी दशकं राज्य करणारा पक्ष आणि त्याचं असं पतन होतं आहे. आमची त्यांच्याबद्दल संवेदना आहे. पण पेशंटलाच जर स्वतःलाच.. तर डॉक्टर काय करणार? जाऊदे मी फार बोलत नाही असं मोदी म्हणाले. ऐकून घेण्याची क्षमताही काँग्रेस पक्ष गमावून बसला आहे.
काँग्रेस आऊटडेटेड पक्ष
काँग्रेसने सत्तेच्या लालसेपोटी लोकशाहीची गळचेपी केली. काँग्रेसने लोकशाही पद्धतीने आलेली सरकारं बरखास्त केली. काँग्रेसने देशाचं संविधान, मर्यादा पाळणाऱ्या लोकांना गजाआड केलं. काँग्रेसने वृत्तपत्रांचा गळा घोटला. काँग्रेसने देश तोडण्याचे नॅरेटिव्ह रचत गेला. आता उत्तर आणि दक्षिण तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता हा काँग्रेस पक्ष लोकशाही शिकवतोय, प्रवचनं देतोय. ज्या काँग्रेसने जात, पात आणि भाषा यांच्या नावे देश तोडला. दहशतवाद आणि फुटीरतावादाला जन्म घालणारे हेच लोक आहेत. देशाला ज्यांनी पिछाडीवर नेलं तो काँग्रेस आहे. काँग्रेस काळात नक्षलवाद मोठं आव्हान झाला. देशाची मोठी जमीन शत्रूच्या हाती सोपवली. आज ते आम्हाला राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा यावर भाषणं देतो आहे? असा प्रश्न मोदी यांनी विचारला आहे.