काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने या आठवडयात आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निमंत्रण दिलेले नाही तसेच माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे नाव सुद्धा या यादीतून गायब आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या भोजन समारंभाचे ज्यांना निमंत्रण होते त्या सर्वांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण देण्यात आले आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपा विरोधात महाआघाडी स्थापन करण्यासाठी काँग्रेसने डिनर डिप्लोमसी केली होती. त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांना काँग्रेसकडून इफ्तारचे निमंत्रण देण्यात आले आहे.
आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रण देण्यात आलेले नाही. काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाकडून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये १३ जूनला ही पार्टी होणार आहे. ज्या राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे त्यांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्यास सांगितले आहे.
प्रणव मुखर्जी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागच्याच आठवडयात प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरमधील कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने त्यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये मोठया प्रमाणावर नाराजीची भावना आहे. प्रणव मुखर्जी यांच्या स्वत:च्या मुलीसह काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.