नवी दिल्ली : काँग्रेसला प्रचंड आर्थिक चणचण भासत असून प्राप्तिकर विभागाच्या दंडात्मक कारवाईला स्थगिती दिली नाही तर, आगामी निवडणूक लढवणेही अशक्य आहे, असा युक्तिवाद काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी प्राप्तिकर अपीलीय लवादासमोर केला. या प्रकरणी लवादाने निकाला राखून ठेवला.
हेही वाचा >>> चीनमधून भारतीयांच्या माहितीवर डल्ला?
निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी पक्षाच्या वतीने किमान निधी पुरवावा लागतो. पण, काँग्रेसची बँक खाती गोठवली गेली तर, पक्षाच्या उमेदवारांचा किमान खर्च देखील करता येणार नाही. असे झाले तर काँग्रेस किती उमेदवारांना निवडणुकीसाठी उभे करू शकेल याबाबत शंका आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागाच्या कारवाईला स्थगिती देण्याची गरज आहे, असा मुद्दा काँग्रेसचे नेते व वकील विवेक तन्खा यांनी केला. मात्र, प्राप्तिकर विभागाच्या वतीने काँग्रेसचा युक्तिवादाला विरोध केला गेला. काँग्रेसला आर्थिक चणचण नसून दंडवसुली एवढा निधी पक्षाकडे आहे. पक्षाने कर भरला नसल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करावी लागत आहे. त्यामुळे दंडापोटी ६५ कोटी रुपये वसूल करण्यात आले अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या वतीने लवादाला देण्यात आली.