काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचं तेलंगणात देवीच्या रुपात पोस्टर लावण्यात आलं आहे. या प्रकारानंतर भारतीय जनता पार्टीने काँग्रेसवर टीका केली आहे. पोस्टर्समध्ये सोनिया गांधी देवीप्रमाणे रत्नजडित मुकुट परिधान केलेल्या दाखवल्या आहेत. पोस्टर्समध्ये त्यांच्या उजव्या तळहातातून तेलंगणाचा नकाशा बाहेर पडताना दिसत आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत. आहे.

भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची ही कृती लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. तसेच देशातील सर्वात जुन्या पक्षाने नेहमीच त्यांचा परिवाराला देश आणि देशातील लोकांपेक्षा मोठं असल्याचं दाखवलं आहे, अशी टीका पूनावाला यांनी केली. काँग्रेसला भारताचा अपमान करण्याची सवय लागली आहे, असंही पूनावाला म्हणाले.

खरं तर, रविवारी हैदराबादमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठक पार पडली. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

या बैठकीनंतर, सोनिया गांधी यांनी तेलंगणातील तुक्कुगुडा येथे एका रॅलीला संबोधित केलं. यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन व्हावं, हे माझं स्वप्न आहे. आपलं सरकार समाजातील सर्व घटकांसाठी काम करेल.

Story img Loader