जम्मू-काश्मीर विधानसभेत भरघोस मतदानानंतर आता त्रिशंकू अवस्थेमुळे सलग तिसऱ्या दिवशी सरकार कोणाचे हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. भारतीय जनता पक्ष आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्ष यांच्यातील बोलणी सकारात्मक निर्णायक ठरू शकली नसून आता नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांच्यातच छुपा समझोता होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसला १२ जागा मिळाल्या असल्या तरीही सत्तास्थापनेमध्ये ते कोणती भूमिका घेतात, यावरही अनेक समीकरणे अवलंबून आहेत.
८७ सदस्य असलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीला २८ तर भाजपला २५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणारा ४४ हा आकडा गाठायचा तर, या दोन पक्षांसाठी ते सहजशक्य आहे. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेली बोलणी फिरत्या मुख्यमंत्रीपदाच्या मुद्दय़ावर रखडली आहेत. भाजपला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्यास पीडीपी अनुकूल नाही.
उलटपक्षी १२ आमदार असलेल्या काँग्रेसशी आघाडी करायची आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या १५ आमदारांचा बाहेरून पाठिंबा घ्यायचा असा पीडीपीचा प्रयत्न असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. राज्यात निवडून आलेल्या अपक्ष आमदारांनीसुद्धा पीडीपीने भाजपसह न जाता नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा घ्यावा अशी भूमिका घेतली आहे. पक्षाच्या नेत्यांमध्येही कोणाला पाठिंबा द्यावा किंवा कोणाचा पाठिंबा घ्यावा यावरून मतभेद आहेत.
नॅशनल कॉन्फरन्ससह न जाता अपक्ष आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा केला जावा, अशी काही नेत्यांची मागणी आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सलमान निझामी यांनीही ‘भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे’ सांगितले. पीडीपीच्या नेत्यांच्या तसेच ६ अपक्ष आमदारांच्या संपर्कात काँग्रेस पक्ष असल्याची माहिती त्यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा