नवी दिल्ली : ‘भारत जोडो’ यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये मार्गक्रमण करत असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ‘सर्जिकल स्ट्राइक’बद्दल वादग्रस्त विधान करून सोमवारी स्वत:च्या पक्षाला अडचणीत आणले. देशाच्या लष्करी जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला नव्हता, ही कारवाई केल्याचा कुठलाही पुरावा नाही, असे वक्तव्य दिग्विजय यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या विधानावर भाजपने तीव्र टीका केलीच पण, काँग्रेसनेही दिग्विजय सिंह यांनाही चपराक दिली. सर्जिकल स्ट्राइकबाबत दिग्विजय सिंह यांचे विधान ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. ते दिग्विजय यांचे वैयक्तिक मत आहे. या विधानाशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही, असे ट्वीट काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी केले. या ट्वीटमुळे दिग्विजय सिंह पक्षामध्ये एकटे पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

काश्मीर खोऱ्यात पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये दहशतावादी हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याचा निर्णय घेतला होता व दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करण्यात आले होते. त्यावरून राजकीय वाद झाला होता. मात्र, दिग्विजय सिंह यांनी सोमवारी सर्जिकल स्ट्राइक झाला नसल्याचा दावा करून पुन्हा वाद उकरून काढला आहे.
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा इतर कार सुरक्षायंत्रणांनी तपासल्या पण, स्फोटके असणारी स्कॉर्पिओ का तपासली गेली नाही? पुलवामानंतर सर्जिकल स्ट्राइक केल्याचा पुरावा केंद्र सरकारने दिलेला नाही. संसदेमध्येही या विषयावर केंद्र सरकारने चर्चा केलेली नाही, असे दिग्विजय सिंह म्हणाले. त्यांच्या या विधानापासून काँग्रेसने स्वत:ला अलिप्त केले आहे. २०१४ पूर्वीही काँग्रेस सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले होते, असे ट्वीट काँग्रेसनेते जयराम रमेश यांनी केले. ‘भारत जोडो’ यात्रा अंतिम टप्प्यात असून ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये सांगता होणार आहे.

भाजपच्या हाती कोलीत
दिग्विजय सिंह यांनी पुलवामा आणि सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्दा उपस्थित करून भाजपच्या हाती कोलीत दिले आहे. ‘‘काँग्रेस नेत्यांच्या विधानावरून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा निव्वळ नावापुरती असून या यात्रेतून भारत तोडण्याचे काम केले जात असल्याचे स्पष्ट होते. राहुल गांधींचे सहकारी देशाच्या विभाजनाचे काम करत आहेत, अशी तीव्र टीका भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केली. सशस्त्र दलांच्या विरोधात बोलल्यास देश खपवून घेणार नाही. राहुल गांधी आणि काँग्रेस पंतप्रधान मोदींचा तिरस्कार करतात पण, द्वेषामुळे ते इतके आंधळे झाले आहेत की, देशासाठी जवानांनी केलेले समर्पणही अव्हेरत आहेत’’, असे भाटिया म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress in trouble due to digvijay singh statement amy