नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी संसदेत पूर्ण ताकदीनिशी मणिपूरमध्ये शांततेची गरज मांडून ही शोकांतिका संपवण्यासाठी सरकारवर दबाव आणेल, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मणिपूर भेटीनंतर गुरुवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचा दौरा करून जनतेच्या समस्या ऐकून घ्याव्यात आणि शांततेचे आवाहन करावे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
‘‘तिथे हिंसाचार सुरू झाल्यापासून मी मणिपूरला तीन वेळा भेट दिली आहे, परंतु दुर्दैवाने परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. आजही राज्य दोन भागात विभागले गेले आहे. घरे जळत आहेत, निष्पापांचे जीव धोक्यात आले आहेत आणि हजारो कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये आपले जीवन व्यतीत करावे लागत आहे,’’ असे राहुल या वेळी म्हणाले. पंतप्रधानांनी वैयक्तिकरित्या मणिपूरला भेट द्यावी, राज्यातील लोकांच्या समस्या ऐकून घ्याव्यात आणि शांततेचे आवाहन करावे, असेही गांधी म्हणाले. २२ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> माजी अग्निविरांसाठी आनंदाची बातमी; सशस्त्र दलात १० टक्के पदे राखीव; केंद्रीय गृहमंत्र्यालयाची मोठी घोषणा!
मणिपूरमधील त्यांच्या मुक्कामादरम्यान, राहुल गांधींनी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील तीन मदत छावण्यांना भेट दिली. हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या मैतेई आणि कुकी या दोन्ही गटांतील लोकांशी संवाद साधला. राहुल गांधींच्या भेटीची पाच मिनिटांची चित्रफीत टॅग करत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा म्हणाल्या की, ‘‘मणिपूर अस्थिर होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. तेथील लोकांना हिंसाचार, खून, दंगली आणि विस्थापनाचा सामना करावा लागत आहे. हजारो निष्पाप लोकांना मदत छावण्यांमध्ये राहायला भाग पाडले जात आहे. अखेर पंतप्रधान मणिपूरवर कधी बोलणार?… मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने प्रयत्न का केले नाहीत?’’ अशी विचारणा करताना प्रियंका दिसत आहेत.
गेल्या वर्षी ३ मे रोजी ईशान्येकडील राज्यात वांशिक हिंसाचार सुरू झाल्यानंतर गांधींनी मणिपूरलाही भेट दिली होती. जानेवारी २०२४ मध्ये त्यांनी मणिपूरमधून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू केली.