पीटीआय, श्रीनगर, लेथपुरा (पुलवामा)

‘‘काँग्रेसची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरसाठी ताज्या हवेची झुळुक असल्याप्रमाणे आहे. त्यामुळे २०१९ नंतर एवढय़ा मोठय़ा संख्येने काश्मीरवासीय घर सोडून बाहेर पडले आहेत,’’ अशी प्रतिक्रिया पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्ष व जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शनिवारी दिली.

दक्षिण काश्मीरच्या पुलवाला जिल्ह्यातील चुरसू येथील पदयात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत मेहबुबा सहभागी झाल्या. भारत जोडो यात्रा शनिवारी सकाळी अवंतीपुरा येथून पुन्हा सुरू झाली. या यात्रेत मेहबूबा मुफ्ती आपली कन्या इल्तिजा मुफ्तीसह सहभागी झाल्या. राहुल यांच्यासह या पदयात्रेत सामील होण्याचा अनुभव चांगला होता, असे ‘ट्वीट’ ‘पीडीपी’कडून नंतर करण्यात आले.

काश्मीरमध्ये या यात्रेचा अखेरचा टप्पा आहे. शनिवारी राहुल यांनी पुलवामा येथील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर शहीद झालेल्या जवानांच्या घटनास्थळी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. चार वर्षांपूर्वी फेब्रुवारी २०१९ मध्ये जैश-ए- मोहम्मदच्या आत्मघातकी हल्लेखोराने केलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान येथे शहीद झाले होते. ताफ्यात सामील असलेल्या बसला लक्ष्य करण्यात आले होते.

प्रियंका गांधी सहभागी
दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा शनिवारी जम्मू-काश्मीरमधील लेथपुरा येथे ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाल्या. कडेकोट बंदोबस्तात प्रियांका यांनी राहुल यांच्यासोबत पदयात्रा केली. यानंतर यात्रा लेथपुरा येथे विश्रांतीसाठी थांबली. ही यात्रा शनिवारी रात्री पंथ चौकात मुक्काम करणार आहे.

पम्पोरमधील गलांदर भागातील बिर्ला शाळेत मुक्काम केल्यानंतर ही यात्रा शनिवारी संध्याकाळी श्रीनगरच्या बाहेरील पंथ चौक येथे पोहोचेल. पांथ चौकात रात्री थांबल्यानंतर ही यात्रा रविवारी पुन्हा सुरू होईल आणि श्रीनगरच्या बुलेवार्ड रस्त्यावरील नेहरू पार्क येथे तिची सांगता होईल. सोमवारी राहुल गांधी एमए रस्त्यावरील काँग्रेसच्या मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकवतील आणि नंतर एस. के. स्टेडियमवर जाहीर सभेस संबोधित करतील. यासाठी विरोधी पक्षांच्या २३ नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

काश्मीरबाबत अपप्रचार करणाऱ्यांना यात्रेतून उत्तर – ओमर
श्रीनगर : ‘‘ भारत जोडो यात्रेस काश्मीरमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, वृत्तवाहिन्या व ‘काश्मीर विशेषज्ञ’ यावर मौन साधून आहेत,’’ अशी टीका ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.त्यांनी केलेल्या ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, की पदयात्रेत सामील होण्यासाठी काश्मीरमध्ये आबालवृद्ध रस्त्यावर उतरले आहेत. काश्मीरवासीयांना देशविरोधी, जातीयवादी आणि असहिष्णु ठरवण्याची एकही संधी सोडत नाहीत अशा तथाकथित काश्मिरी तज्ज्ञांनी याबाबत बाळगलेले सोयीस्कर मौन सर्वात खेदजनक आहे. ‘भारत जोडो यात्रे’त काश्मीरवासीयांच्या मोठय़ा सहभागामुळे काश्मीरविषयक अपप्रचार करणाऱ्यांच्यी श्रीमुखात लगावली गेली आहे. त्यामुळेच त्यांनी मौन बाळगले आहे. ओमर हे शुक्रवारी बनिहाल येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.