काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत आज(गुरुवार) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीही सहभागी झाल्या. त्यांनी राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेत सहभागी असलेल्या अन्य सहकाऱ्यांसोबत पदयात्राही केली. यामुळे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांमध्ये अधिकच उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले.

कर्नाटकातील मांड्या येथे सोनिया गांधींनी आज भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. त्या जकन्नाहल्ली येथे पोहचल्या आणि पांडवपुरा तालुक्यातून सकाळी साडेसहा वाजता पदयात्रेत सहभागी झाल्या आजही पदयात्रा संध्याकाळी सातवाजता नागमंगळा तालुक्यात संपणार आहे. या पदयात्रेनंतर ब्रम्ह्मदेवराहल्ली गावात सभा होणार आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले, “सोनिया गांधी या यात्रेत सहभागी झाल्या हा ऐतिहासिक क्षण आहे. यामुळे कर्नाटकात पक्षाला अधिक बळकटी येईल.”

भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि मागील शुक्रवारी राहुल गांधी केरळ सीमेला लागून असलेल्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट मार्गे कर्नाटकात पोहचले आणि तिथून या यात्रेने कर्नाटकात प्रवेश केला.

Story img Loader