नवी दिल्ली : संसदेच्या आवारातील गोंधळाचे तीव्र पडसाद गुरुवारी दोन्ही सभागृहांत उमटले. लोकसभेचे कामकाज दुपारी तीन वाजल्यानंतर काही मिनिटांमध्ये तहकूब झाल्यावर काँग्रेसचे सदस्य लोकसभाध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचले. आसनाच्या दुतर्फा उभे राहून त्यांनी ‘जय भीम’च्या घोषणा दिल्या. सभागृह स्थगित झाल्यानंतरही काँग्रेसची घोषणाबाजी पाहून भाजपचे सदस्यही थबकले.
लोकसभेचे कामकाज सुरू होण्याआधीच काँग्रेसचे सदस्य घोषणाबाजी करत होते. वर्षा गायकवाड यांच्याह इतर सदस्यांनी या वेळी ‘जय भीम’च्या घोषणा देत असतानाच पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनी सभागृह तहकूब केले. तोपर्यंत काँग्रेसचे सदस्य आंबेडकरांच्या छायाचित्रांचे फलक घेऊन लोकसभाध्यक्षांच्या समोरील जागेत पोहोचले. सैकिया आसनावरून उठून जाताच काँग्रेसच्या सदस्यांनी आसनाच्या आसपासच्या जागेचा ताबा घेतला. लोकसभाध्यक्षांच्या आसनाच्या शेजारी उभे राहून काही मिनिटे काँग्रेस सदस्यांची नारेबाजी सुरू होती.
हेही वाचा >>>Parliament Scuffle : राहुल गांधींना दिलासा! हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा घेतला मागे, ‘हे’ गुन्हे कायम!
लोकसभेचे सभागृह सकाळी ११ वाजता सुरू होताच गोंधळामुळे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी तातडीने कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले. काँग्रेसच्या सदस्यांनी अमित शहांच्या माफीची व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चेची मागणी केली.
राज्यसभेतही गोंधळ
राज्यसभेतही काँग्रेसच्या सदस्यांच्या गोंधळामुळे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृह दोन वाजेपर्यंत तहकूब केले. पुन्हा सभागृह सुरू होताच भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधींचे नाव घेत महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपच्या राज्यसभेतील खासदार फान्गनॉन कोन्याक यांनीही राहुल गांधींवर आरोप केला. या गोंधळात राज्यसभाही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.