लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह सर्वपक्षीय खासदारांची भाषणं पार पडली. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसच्या घोटाळ्यांचा पाढा वाचला. तसंच २०१४ च्या पूर्वी किती निराशा होती तेदेखील सांगितलं. एवढंच नाही तर राहुल गांधींचं नाव न घेता त्यांनी खिल्ली उडवली. लोकसभेत काँग्रेसचा सलग तिसरा पराभव आहे. याबाबत काँग्रेसने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे असा सल्लाही मोदींनी दिला. तसंच २०२४ पासून काँग्रेसची ओळख परजीवी पक्ष अशीच होत राहिल असंही मोदी म्हणाले.

कोळसा घोटाळ्यात अनेकांचे हात काळे झाले

एक काळ होता जेव्हा कोळसा घोटाळ्यात अनेकांचे हात काळे झाले होते. आज कोळशाचं सर्वाधिक उत्पादनाचे विक्रम आपण केले आहेत. आता देश म्हणतोय की आपण काहीही करु शकतो. एक काळ असा होता २०१४ च्या आधी फोन बँकिंग करुन बँक घोटाळे करण्यात आले. बँकेची संपत्ती व्यक्तिगत प्रॉपर्टी म्हणून लुटण्यात आला. आम्ही २०१४ नंतर ही धोरणं बदलली. त्यामुळेच आपल्या देशांचं नाव जगातल्या प्रसिद्ध बँकांमध्ये घेतलं जाऊ लागलं असं नरेंद्र मोदी म्हणाले.

हे पण वाचा- पंतप्रधान मोदींनी घेतली राहुल गांधींची फिरकी, “बालबुद्धी असलेल्या..”, ‘शोले’तला ‘तो’ डायलॉगही म्हटला

बेशरमपणे मान्य केलं जायचं की…

एक कालखंड देशाने पाहिला आहे की ज्यावेळी बेशरमपणे हे मान्य केलं जायचं की दिल्लीतून एखाद्या प्रकल्पासाठी १ रुपया निघाला योजनेपर्यंत १५ पैसे पोहचतात. १ रुपयात ८५ पैशांचा घोटाळा होत होता. घोटाळ्यांच्या खाईत देश बुडाला होता. शिफारस न करता काहीही मिळत नव्हतं. गरीबाला घर घ्यायचं असेल तर लाच द्यावी लागत होती. गॅस कनेक्शनसाठी खासदारांच्या घरी जावं लागायचं. मोफत रेशनही लोकांना मिळत नव्हतं, त्यासाठी लाच द्यावी लागत होती. देशाने २०१४ मध्ये आम्हाला निवडलं आणि तो देशाच्या परिवर्तानाचा प्रारंभ होता. १० वर्षांत आम्ही देशाचा आत्मविश्वास परत आणला. आज देशाचा आत्मविश्वास दुणावला आहे, भारत काहीही करु शकतो हे देशातल्या सामान्य माणसाला वाटतं.

काँग्रेसची ओळख आतापासून परजीवी पक्ष

निवडणूक निकालांनी हे दाखवून दिलं की काँग्रेस पक्ष परजीवी आहे. २०२४ पासून काँग्रेसची ओळख परजीवी पक्ष अशीच कायम राहणार आहे. परजीवी तो असतो जो एखाद्या शरीरात राहिला तरीही ते शरीरच तो खातो. झाडावर राहिला तर झाड खातो. काँग्रेस पक्षही तसाच आहे. ज्या पक्षांना बरोबर घेतो त्यांचीच मतं खातो. सहकारी पक्षांना त्याग करावा लागतो त्या त्यागावरच काँग्रेसला बहर येतो. त्यामुळे काँग्रेस हा पक्ष परजीवी पक्ष झाला आहे.

१६ राज्यांमध्ये काँग्रेसचा स्ट्राईक रेट फक्त २६ टक्के

तुम्हाला वाटेल मी जे बोलतोय त्यात काय तथ्य आहे? पण मी हे सगळं पुराव्यांच्या आधारेच बोलतो आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस यांची सरळ लढत ज्या ठिकाणी होती तिथे काँग्रेसचा स्ट्राईक रेट अवघा २६ टक्के आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसने आघाडी केली आहे आणि त्यांचा सहकारी पक्ष भाजपाशी लढला त्या ठिकाणी काँग्रेसचा स्ट्राईक रेट ५० आहे. काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या पण त्यामागे त्यांच्या सहकारी पक्षांचं योगदान आहे. १६ राज्यांमध्ये काँग्रेसने थेट आम्हाला टक्कर दिली तिथे काँग्रेसचं व्होट शेअरिंग पडलं आहे. गुजरात, छत्तीसगढ, मध्य प्रदेश या ठिकाणी काँग्रेसला ६६ पैकी २ जागांवर विजय मिळाला आहे. या सगळ्या तथ्यांच्या आधारेच मी म्हणतो आहे की काँग्रेस पक्षाची ओळख आता परजीवी पक्ष अशी झाली आहे.