भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस हा दहशतवाद्यांच्या मृत्यूवर रडणारा पक्ष असल्याचं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. तसेच एखाद्या दहशतवाद्याला ठार केल्यानंतर हे काँग्रेसचे नेते त्यांच्या घरी पैसा देण्यासाठी, दु:ख व्यक्त करण्यासाठी जातात, अशी टीकाही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलीय.
“बाटला हाऊसमध्ये जे झालं त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी रडल्या होत्या. दहशतवाद्यांच्या मृत्यूवर रडणारा काँग्रेस पक्ष हा कधीच देशभक्तांचा पक्ष असूच शकत नाही. ते कधीच देशभक्तीच्या गोष्टी करु शकणार नाहीत,” असं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्यात. “आरएसएसमुळे काँग्रेसला पूर्ण मतांतर करता येत नाहीय, त्यांना दहशतवाद पसरवता येत नाहीय. आरएसएस यावर अंकूश लावत असेल तर ते सत्ता गाजवताय असं नाहीय. आरएसएसची सत्ता नाहीय. पण आरएसएस ही संघटना घराघरात, जन माणसामध्ये रुझलेली आहे, म्हणून ते आरएसएसला त्रासलेले आहेत,” असंही प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्यात.
संघामुळेच देश सुरक्षित आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसमुळेच देश सुरक्षित असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. जगामध्ये बंधुत्वभाव टिकून राहण्यासाठी आरएसएसच जबाबदार असल्याचा दावा प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलाय. तसेच उपद्रव माजवणाऱ्या लोकांपासून आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच शांती मिळाली आहे असंही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमध्ये मोठ्याप्रमाणामध्ये धर्मांतर होत असल्याचा आरोप प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला. हे धर्मांतर रोखण्याचं काम संघ करत असल्याचंही त्या म्हणाल्या. “विश्वामधील बंधुत्वाची भावना जिवंत असेल तर ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे आहे. देश आरएसएसमुळे सुरक्षित आहे. कुठेही कोणत्याप्रकार उपद्रवी लोकांपासून आपल्याला शांती मिळते ती आरएसएसमुळे आहे,” असं प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या.
ख्रिश्चन धर्मात प्रवेश दिला जातोय
पुढे बोलताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी, “छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना मी सांगू इच्छिते की त्यांनी त्यांच्या राज्यात, प्रदेशामध्ये वाकून पहावं. येथे एवढ्या मोठ्याप्रमाणात धर्मांतर होत आहे की हिंदूंचं धर्मांतर करुन त्यांना ख्रिश्चन धर्मात प्रवेश दिला जातोय. याचे पुरावे आहेत. जनता त्रस्त आहे. येथे एवढा भ्रष्टाचार आहे एवढा अन्याय होतोय तरी ते शांत बसले. त्यांनी जरा या गोष्टींकडे पहावं,” असा सल्ला दिलाय.
काही पिढ्या किंवा जन्म खर्च करावे लागतील…
“आरएसएस समजून घेण्यासाठी त्यांना काही पिढ्या किंवा जन्म खर्च करावे लागतील. तरीही त्यांना आरएसएस समजून घेता येणार नाही कारण त्यांच्याकडे ते समजून घेण्याचा भावच नाहीय,” अशी टीका प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलीय.
आधी आपल्या घरात पाहा मग…
त्याचप्रमाणे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी, “टीका करणाऱ्यांचा आरएसएसला काही फरक पडत नाही असं मला वाटतं. आधी आपल्या घरात पाहा मग बाहेर बघा,” असा खोचक सल्लाही विरोधकांना दिलाय.