संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविथी पार पडला. मात्र, लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून अटीतटीचं राजकारण पाहण्यास मिळत आहे. एनडीएकडून ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. तसेच इंडिया आघाडीकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस खासदार के.सुरेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी (२६ जून) सकाळी ११ वाजता निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आता सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. काँग्रेसने व्हिप जारी करत बुधवारी सर्व खासदारांना संसदेत हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीन ओळीचा हा व्हिप असून काँग्रेस पक्षाच्या सर्व खासदारांना उद्या सकाळी ११ वाजता सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच उद्या सकाळी ११ वाजेपासून ते संसदेचे कामकाज संपेपर्यंत सभागृहात हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकसभेत उद्या महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात येईन, त्यासाठी काँग्रेसच्या सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित राहावे, असं व्हिप जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
Congress issues a three-line whip to its party MPs in Lok Sabha to remain present in the House tomorrow, 26th June pic.twitter.com/x9fGMAoOuJ
— ANI (@ANI) June 25, 2024
दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीकडून काँग्रेस खासदार के.सुरेश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर एनडीएकडून ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बुधवारी (२६ जून) रोजी लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
भारताचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहता याआधी फक्त दोन वेळा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली आहे. त्यात सर्वात पहिली १९५२ ची निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्यानंतर आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत अशाच प्रकारे अध्यक्षपदावर सहमती न झाल्यामुळे निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर थेट यावेळी लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी एनडीए आणि विरोधकांमध्ये एकमत झाल्याचं बोललं जात होतं. मात्र, इंडिया आघाडीकडून उपाध्यक्षपदासाठी आग्रह धरला. मात्र, उपाध्यक्षपद देण्यास एनडीएने नकार दिल्यामुळे इंडिया आघाडीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्यात आला आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला. फोनवरुन राजनाथ सिंह यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठीच्या एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. आम्ही विनंती मान्य करुन एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. पण लोकसभेचं उपसभापतीपद विरोधकांना मिळालं पाहिजे. मल्लिकार्जुन खरगे यांना फोन परत करणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी काल सांगितलं होतं. मात्र त्यांनी फोन केला नाही”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.