PM Modi Kashmir Visit : जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पहिलाच दौरा संपन्न झाला. श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर झालेल्या जाहीर सभेत त्यानी ६,४०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये मागच्या पाच वर्षांत झालेल्या बदलांचा आढावा घेतला. कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विकासाची गंगा कशी पोहोचली? याची माहिती त्यांनी दिली. तसेच कलम ३७० च्या नावावर काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सामान्य जनतेची कशी दिशाभूल केली, याचीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दिली.

जम्मू-काश्मीरच्या जनतेला आम्ही समान अधिकार दिले

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक वर्ष कलम ३७० च्या नावावर जम्मू-काश्मीरच्या लोकांची दिशाभूल केली. कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरच्या काही राजकीय कुटुंबांनाच फायदा होत होता. आज ३७० नसल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या युवकांच्या कौशल्याचा सन्मान केला जात आहे. आज जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळत आहे. मागच्या ७० वर्षात इथल्या वाल्मिकी समुदायाला मतदानाचा अधिकार मिळाला नव्हता. इथल्या अनुसूचित जातींना आरक्षण मिळाले नव्हते. ते आता मिळत आहे. अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी विधीमंडळात जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. घराणेशाही असलेल्या पक्षांनी जम्मू-काश्मीरच्या जनतेला अनेक वर्ष अधिकारापासून वंचित ठेवले होते.”

बुडणारी ‘जे अँड के’ बँक नफ्यात आणली

“जम्मू-काश्मीरमध्ये घराणेशाही आणि भ्रष्टाचाराची युती खूप जुनी आहे. ‘जे अँड के’ बँकेचे दिवाळे काढण्यात घराणेशाही असलेल्या पक्षाने कोणतीही कसर सोडली नव्हती. जवळच्या लोकांना नोकरी लावणे आणि गैरव्यवहार यामुळे बँकेचे कंबरडे मोडले. सामान्य जनतेचे पैसे बँकेत बुडणार होते. त्यामुळे ‘जे अँड के’ बँकेला वाचविण्यासाठी आमच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. चुकीच्या पद्धतीने झालेल्या भरतीविरोधात आम्ही कारवाई केली. आजही या भरतीची चौकशी सुरू आहे. बँकेला १००० कोटींचे भांडवल देऊन बँक पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न केला. एकेकाळी बुडण्याच्या मार्गावर असलेली ‘जे अँड के’ बँक मोदी गॅरंटीमुळे आज नफ्यात गेली आहे”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

आता ‘वेड इन इंडिया’

जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन वाढीस लागले असून त्याला आणखी चालना देण्याचेही सुतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते म्हणाले, “प्रवासी भारतीयांना माझे आवाहन आहे की, तुम्ही भारतात डॉलर किंवा पाऊंड पाठवा किंवा पाठवू नका. पण प्रत्येकाने पाच कुटुंबांना भारतात पर्यटन करण्यासाठी उद्युक्त करावे. तसेच मी भारतीय नागरिकानांही आवाहन करतो की, तुम्ही जेव्हा भारतात कुठेही पर्यटन करता. तेव्हा तुमच्या एकूण बजेटपैकी काही रक्कम तिथल्या स्थानिक वस्तू विकत घेण्यासाठी राखून ठेवा. जेणेकरून तिथली अर्थव्यवस्था मजबूत होईल.” वेड इन इंडिया या कार्यक्रमाचेही आवाहन मोदी यांनी केले. बाहेरच्या देशात लग्नाला जाण्यापेक्षा भारतीय नागरिकांनी जम्मू-काश्मीरमध्ये येऊन लग्न करावे. इथे अनेक ठिकाणं आहेत, जिथं डेस्टिनेशन वेडिंगचा आनंद घेता येईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.