पंजाब जालंधरचे खासदार संतोख सिंह चौधरी यांचं निधन झालं आहे. संतोख सिंह ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाले होते. तेव्हा अचानक त्यांची प्रकृती खालावली. यानंतर संतोख सिंह यांना तत्काळ फगवाडा येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
खासदार चौधरी संतोख सिंह हे राहुल गांधी यांच्याबरोबर ‘भारत जोडो यात्रे’त चालत होते. त्यावेळी चालत असताना संतोख सिंह यांची तब्येत खालावली. संतोख सिंह यांना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांचं निधन झालं असल्याचं सांगितलं आहे.
ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं असल्याचं समोर आलं आहे. ही माहिती मिळताच ‘भारत जोडो यात्रा’ स्थगित करण्यात आली. तसेच, राहुल गांधी रुग्णालयात दाखल झाले.
‘भारत जोडो यात्रा’ आज ( १४ जानेवारी ) सकाळी लोडोवाल येथून सुरु झाली. यात्रा १० वाजता जालंदर मधील गोराया येथे थांबत विश्रांती करणार होती. त्यानंतर दुपारी ३ वाजता पुन्हा यात्रा सुरु होत, सायंकाळी सहा वाजता फगवाडा बस स्टॉप जवळ थांबणार होती. ‘भारत जोडो यात्रे’चा रात्री मुक्काम कपूरथाला येथील कोनिका रिसोर्ट जवळ होता.