केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी छत्तीसगडच्या दौऱ्यात नथुराम गोडसेबद्दल केलेल्या एका विधानावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. गिरीराज सिंह यांनी नथुराम गोडसेचा उल्लेख ‘भारताचे सुपुत्र’ असा केल्यामुळे त्यावरून विरोधकांनी आगपाखड केली आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी गिरीराज सिंह यांच्यावर परखड शब्दांत टीका केली आहे. तसेच, सिब्बल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सवाल केला आहे.

नेमकं काय म्हणाले गिरीराज सिंह?

गिरीराज सिंह यांनी नथुराम गोडसेचा उल्लेख ‘भारताचे सुपुत्र’ असा करताना महात्मा गांधींच्या हत्येचाही उल्लेख केला. “नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली असली तरीही तो भारताचा सुपुत्र होता. कारण नथुराम गोडसेचा जन्म भारतात झाला. ते भारतात जन्माला आले. औरंगजेब किंवा बाबर यांच्या प्रमाणे घुसखोर नव्हता. ज्याला बाबरची अवलाद आहोत हे म्हणण्यात धन्यता वाटते तो भारतमातेचा सुपुत्र असू शकत नाही”, असं गिरीराज सिंह म्हणाले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूर तणाव प्रकरणी बोलताना “महाराष्ट्रात काही ठिकाणी अचानक औरंगजेबाच्या औलादी जन्माला आल्या आहेत”, असं विधान केलं होतं. त्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी “तुम्हाला सगळं माहिती आहे का? मला माहिती नव्हतं तुम्ही इतके तज्ज्ञ आहात. मग तर तु्म्हाला नथुराम गोडसे आणि आपटेची मुलं कोण आहेत हेही माहिती असेल. कोम आहेत ते?” असा सवाल केला होता. यावर प्रतिक्रिया देताना गिरीराज सिंह यांनी वरील विधान केलं.

कपिल सिब्बल यांचं टीकास्र!

दरम्यान, ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे. गिरीराज सिंह यांच्या विधानाचा समाचार घेताना ते म्हणाले, “याचा अर्थ इथे जन्माला आलेल्या भारतीयानं हत्या केली तरी तो भारताचा सुपुत्र का? गिरीराज सिंह यांच्यामते नथुराम गोडसे भारताचे सुपुत्र होते का?”

“महात्मा गांधींची हत्या केली असली तरीही नथुराम गोडसे भारताचा सुपुत्र, औरंगजेब…”, गिरीराज सिंह यांचं वक्तव्य

“संविधानानुसार मंत्रिमंडळाची एक जबाबदारी असते. त्यामुळे याचा अर्थ गिरीराज सिंह केंद्र सरकारच्या वतीनेच बोलत आहेत. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह सुद्धा गिरीराज सिंह यांच्याशी सहमत आहेत का? त्यामुळेच मी माझ्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी हे विधान नाकारलं पाहिजे. गिरीराज सिंह यांनी जे म्हटलंय, ते चूक आहे असं मोदी-शाहांनी सांगावं. पण मला शंका आहे की असं होणार नाही. कारण भाजपाचा हाच हेतू आहे”, असं कपिल सिब्बल म्हणाले.

“भाजपा तर स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी नव्हती. कारण भाजपा तर तेव्हा नव्हतीच. आरएसएस होती. पण भाजपाचा हेतू तर आरएसएसचाच आहे. जी आरएसएस महात्मा गांधींबरोबर चालली नाही, ज्या आरएसएसनं इंग्रजांबरोबर तडजोड केली, इंग्रजांना सांगितलं की आम्ही तुमची मदत करू, ती आरएसएस महात्मा गांधींना कशी मानू शकते? त्यामुळे ही विचारसरणी महात्मा गांधींच्या आचरणाच्या विरुद्ध आहे. याच विचारसरणीच्या आधारावर हे राजकारण करत आहेत”, अशा शब्दांत कपिल सिब्बल यांनी गिरीराज सिंह आणि भाजपावर हल्लाबोल केला.

Story img Loader