अफगाणिस्तानमध्ये तालीबान्यांचं काळजीवाहू सरकार अस्तित्वात आल्यानंतर जगभरातून चिंतेचा सूर उमटला आहे. या पार्श्वभूमीवर आशिया खंडातील एक प्रमुख देश म्हणून भारताची यासंदर्भातली भूमिका महत्त्वाची ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षपद निभावलेल्या ब्रिक्स देशांच्या यंदाच्या बैठकीमध्ये अफगाणिस्तानमध्ये शांततापूर्ण स्थैर्य निर्माण करण्यावर भर देण्यात आला. मात्र, काँग्रेसकडून या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी भारताच्या अफगाणिस्तानसंदर्भातल्या भूमिकेवरून तीव्र आक्षेप घेत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कपिल सिब्बल यांनी आपल्या ट्विटरवरून ही टीका केली आहे.
तालिबानबाबत भारताची भूमिका?
अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक स्थैर्य निर्माण करण्याच्या प्रक्रियेत भारताला भूमिका नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. “अफगाणिस्तानमधील सर्वसमावेशक चर्चांमध्ये भारत कुठेही नाही. तालिबान्यांच्या सत्तेसंदर्भात आपलं धोरण हे आपलं सरकार त्याचा उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये कसा फायदा घेतं यावर अवलंबून असणार आहे. हेच कटू सत्य आहे. माध्यमांनी तर आत्तापासूनच या सगळ्या प्रकारातली त्यांची भूमिका निभावायला सुरुवात केली आहे”, असं ट्वीट कपिल सिब्बल यांनी केलं आहे.
Afghanistan
We are hardly a player in an “ inclusive intra-Afghan dialogue ”.
Our policy towards the Taliban regime will be guided by how this regime can use it to it’s advantage in the UP Assembly election.
That is the bitter truth !
The media is already playing its part !
— Kapil Sibal (@KapilSibal) September 10, 2021
ब्रिक्सच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी
नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स देशांच्या बैठकीचं अध्यक्षपद यंदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवलं. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश असलेल्या ब्रिक्सने बैठकीत अफगाणिस्तानमध्ये शांततापूर्ण मार्गाने सर्वसमावेशक चर्चा घडवून स्थैर्य प्रस्थापित करण्याची भूमिका मांडली.
दहशतवादाविरोधात ब्रिक्स देश एकवटले; पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा
“ब्रिक्स विकसनशील देशांच्या प्राधान्यक्रमावर लक्ष केंद्रित करते, त्यामुळे हा गट जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावी आवाज म्हणून उदयास आला आहे”, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी झालेल्या ब्रिक्सच्या बैठकीत बोलताना मांडली. “गेल्या दीड दशकात ब्रिक्सने खूप चांगली कामगिरी केली आहे. आज आपण जगाच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावी आवाज आहोत. पुढील १५ वर्षांत ब्रिक्स अधिक उत्पादनक्षम कसे होईल, याबद्दल आपण काम करायला हवं,” असंही मोदी यावेळी म्हणाले.