महाराष्ट्र सदनात घडलेल्या शिवसेना खासदारांच्या ‘राडा’ प्रकरणाला धार्मिक वळण लागले असले तरी विरोधी पक्ष काँग्रेसने त्यावर मौन बाळगले आहे. यंदा वर्षअखेर महाराष्ट्र, हरयाणा तर पुढील वर्षी काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने काँग्रेसने हिंदू मतांचे ध्रुवीकरण होऊ नये यासाठी या प्रकरणी राज्यसभेत सौम्य भूमिका घेतली. सेना खासदारांनी सदनातील मुस्लीम कर्मचाऱ्याच्या तोंडात रोटी कोंबून रोजा मोडल्याच्या वृत्तानंतर काँग्रेस व विरोधी पक्षांनी लोकसभेत आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी केलेल्या निवेदनात शिवसेना व मुस्लीम कर्मचाऱ्याचा रोजा मोडल्याचा उल्लेख नव्हता. त्यावर मात्र काँग्रेसने चकार शब्दही काढला नाही.
लोकसभेत काँग्रेसचे मूठभर सदस्य असले तरी राज्यसभेत ते बहुसंख्य आहेत. सदनातील घटनेनंतर सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची संधी काँग्रेसला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी काँग्रेसने सभात्याग करत निषेध व्यक्त केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची नोटीसदेखील लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना दिली होती. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीच्या आधारावर राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत निवेदन दिले. ते म्हणाले की, नवीन महाराष्ट्र सदनात आयआरसीटीसी देत असलेल्या भोजनाच्या गुणवत्तेवर महाराष्ट्रातील काही खासदारांनी आक्षेप घेतला. त्यांनी ही सेवा तात्काळ खंडीत करण्याची मागणी केली. स्वयंपाकघर व निवासी आयुक्तांच्या कार्यालयातदेखील सदस्यांनी आपला रोष व्यक्त केला. आयआरसीटीसीचे व्यवस्थापक अर्शद जुबैर यांच्याकडे जेवणाची तक्रार करीत त्यांच्या तोंडात पोळी कोंबण्याचा कथित प्रयत्न केला. आयआरसीटीसीने १८ जुलैला सदनाला सेवा पुरवण्याचा करार रद्द करीत असल्याचे पत्राद्वारे राज्य सरकारला कळवले. दरम्यान, अर्शद जुबैर, निवासी आयुक्त अथवा मुख्य सचिवांनी या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केलेली नाही.
विरोधकांची शांतता..
सदनातील प्रकार अत्यंत खेदजनक असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. भारतीय नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे संवर्धन करण्यास सरकार कटिबद्ध आहे. सर्वधर्मसमभाव स्थापण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी शेवटी केले. राजनाथ सिंह यांच्या निवेदनाने काँग्रेससह विरोधी सदस्यांचे समाधान झाले हे विशेष. त्यांच्या निवेदनात ना सेनेचा उल्लेख होता, ना रोजा मोडल्याचा! पोळी कोंबण्याचा प्रकारदेखील कथित असल्याचे ते म्हणाले. त्यानंतरही विरोधक शांत होते.
मतांचे ध्रुवीकरण टाळण्यासाठी काँग्रेसचे मौन?
महाराष्ट्र सदनात घडलेल्या शिवसेना खासदारांच्या ‘राडा’ प्रकरणाला धार्मिक वळण लागले असले तरी विरोधी पक्ष काँग्रेसने त्यावर मौन बाळगले आहे.
First published on: 26-07-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress keeps mum over maharashtra sadan issue in rajya sabha