काँग्रेसच्या थिंक टँकमधील सदस्य आणि वरिष्ठ नेते तथा राहुल गांधी यांचे राजकीय सल्लागार सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका वक्तव्याने मोठा वाद उफाळून आला आहे. पित्रोदा यांनी एका पॉडकास्टमध्ये भारतात विविधतेत एकता असल्याचं सांगत असताना त्यांनी भारताच्या विविध भागातील भारतीय कसे वेगवेगळे दिसतात, यावर भाष्य केले आहे. हे सांगत असताना त्यांनी त्वचेच्या रंगानुसार भारतीयांची चीनी, अरबी, पाश्चात्य आणि आफ्रिकन्स लोकांशी तुलना केली आहे. “भारताच्या दक्षिणेकडे राहणारे लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील लोक हे चीनी लोकांप्रमाणे दिसतात”, असं सॅम पित्रोदा यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद उफाळून आला आहे.
सॅम पित्रोदा यांच्या या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पार्टीतील अनेक नेत्यांनी पित्रोदा, काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका प्रचारसभेत म्हणाले, राहुल गांधींच्या निकटवर्तीयांनी भारतीयांना आफ्रिकन संबोधून एकप्रकारे शिवी दिली आहे.
सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसवर टीका होत असताना यावर आता काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी पित्रोदा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणारी एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, सॅम पित्रोदा यांनी एका पॉडकास्टमध्ये भारतातलं वैविध्य सांगताना ज्या प्रकारची तुलना केलीय ते दुर्दैवी आणि स्वीकारण्यासारखं नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अशा उपमा आणि वक्तव्यांशी कोणताही संबंध नाही.
सॅम पित्रोदा काय म्हणाले होते?
द स्टेट्समनला दिलेल्या मुलाखतीत भारताच्या लोकशाहीबाबत सविस्तर मत मांडत असताना सॅम पित्रोदा म्हणाले, गेल्या ७५ वर्षांत भारतातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आले आहेत. या काळात काहीसे मतभेद झाले असतील, पण ते तेवढ्यापुरतेच होते. भारतात एका बाजूला ईशान्येकडील लोक चीनी लोकांसारखे दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, तर उत्तर भारतातील लोक कदाचित गोऱ्या पाश्चात्य लोकांसारखे आणि दक्षिणेतील लोक आफ्रिकन नागरिकांसारखे दिसतात. तरीही त्यांचा भारतीयांच्या जगण्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. आम्ही सर्वच बंधू आणि भगिनींप्रमाणे एकत्र नांदत आहोत.
हे ही वाचा >> “मी मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, पंतप्रधान मोदींची रोखठोक भूमिका
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “आपल्या त्वचेचा रंग कोणताही असो, आपण भगवान श्रीकृष्णाची भक्ती करणारे लोक आहोत. मला पित्रोदा यांच्या वक्तव्याचा खूप राग आलाय. संविधानाचं रक्षण करण्याच्या गप्पा मारणारे लोक त्वचेच्या रंगावरून भारतीय जनतेचा अपमान करत आहेत. विरोधकांनी मला शिवीगाळ केल्याने मला फरक पडत नाही. ते मी सहन करू शकतो. परंतु, माझ्या देशातील जनतेला कोणी काही म्हटलं, तर ते मला सहन होणार नाही. कोणाच्याही त्वचेच्या रंगावरून त्याची गुणवत्ता ठरवू शकत नाही.”