तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे सुपूत्र क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली आहे. यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर भाजपासह विविध स्तरातून टीका करण्यात येत आहे. यावर काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद यांनी उदयनिधी स्टॅलिन यांना फटकारलं आहे.
उदयनिधी स्टॅलिन काय म्हणाले?
“सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे,” असं विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं.
हेही वाचा : “भारत हिंदूंचा देश, तुम्ही पाकिस्तानात…”, कर्नाटकातील शिक्षिकेचे मुस्लीम विद्यार्थ्यांना आक्षेपार्ह वक्तव्य
या वक्तव्याबद्दल ‘एएनआय’शी बोलताना काँग्रेस नेते आचार्य प्रमोद म्हणाले, “हिंदूंना शिव्या देण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. सनातन धर्माला संपवण्याचे प्रयत्न हजारो वर्षांपासून सुरू आहेत. पण, सनातन धर्माला कोणी संपवू शकले नाही. एक हजार वर्षे भारत गुलाम होता. एक हजार वर्ष सनातन धर्माला संपवण्याचे प्रयत्न झालेत.”
“सनातन धर्माला संपवण्याचं स्वप्न ब्रिटिश आणि मुघलांनी पाहिलं. मात्र, सनातन धर्म संपू शकला नाही,” असं आचार्य प्रमोद यांनी म्हटलं.
भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी ट्वीट करत उदयनिधी स्टॅलिन यांना लक्ष्य केलं. “मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे पुत्र आणि द्रमुक सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली आहे. सनातन धर्माला फक्त विरोध न करता तो संपवला पाहिजे, असं स्टॅलिन यांचं मत आहे. थोडक्यात सनातन धर्म मानणाऱ्या देशातील ८० टक्के लोकसंख्येला संपवण्याची ते भाषा करत आहेत.”
हेही वाचा : ‘एक देश-एक निवडणूक समिती’च्या सदस्यपदास अधीररंजन यांचा नकार; माजी राष्ट्रपती कोविंद अध्यक्ष
“द्रमुक हा विरोधी पक्षातील प्रमुख तर काँग्रेसचा सहकारी पक्ष आहे. स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर मुंबईतील बैठकीत एकमत झालं होतं होतं का?” असा सवाल अमित मालवीय यांनी विचारला आहे.