तीन आठवड्यांनंतर अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. २२ जानेवारी रोजीच्या या कार्यक्रमासाठी देशातील अनेक नेतेमंडळी, मान्यवर, सेलिब्रिटी, मोठे उद्योगपती, आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. अयोध्येत सध्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी चालू आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून या सगळ्या घडामोडींवर निवडणूक राजकारण म्हणून टीका केली जात आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला जात असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील काँग्रेस नेत्यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा होऊ लागली आहे.
“सिद्धरामय्या हेच राम”
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेदेखील अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जाणार असल्याचं बोललं जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे माजी मंत्री व काँग्रेस नेते एच. अंजनेय यांनी चित्रदुर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
“सिद्धरामय्या हे स्वत:च राम आहेत. त्यांना अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेण्याची काय गरज आहे? अयोध्येमध्ये भाजपाचे राम आहेत. सिद्धरामय्यांच्या गावात रामाचं मंदिर आहे. तिथे जाऊन ते रामाचं दर्शन घेतील”, असं अंजनेय म्हणाले आहेत. “भाजपाकडून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा जाणून बुजून तापवला जात आहे. राम सर्वत्र आहेत. राम आपल्या हृदयात आहेत. माझं नाव अंजनेय आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रामायणात अंजनेयानं काय केलं होतं”, असं त्यांनी म्हटलं.
भाजपावर हल्लाबोल
दरम्यान, यावेळी अंजनेय यांनी भाजपावर परखड शब्दांत टीका केली. “धर्माच्या आधारावर फोडा आणि राज्य करा अशीच भाजपाची नीती राहिली आहे. भाजपाला असं वाटतंय की जर त्यांनी एका धर्मावर सातत्याने हल्ले केले तर इतर धर्माचे लोक त्यांना मत देतील. आम्हीही हिंदू आहोत. त्यांनी काही हिंदू धर्म किंवा हिंदू लोकांना विकत घेतलेलं नाही”, असं अंजनेय म्हणाले.
“आजही काही दलित लोक अशा ठिकाणी राहतात जी जागा रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या राहण्यासाठीही योग्य नाही. या लोकांसाठी घरं बांधून त्यांना तिथे हलवायला हवं. या घरांना राम मंदिर म्हणा. मग खरे राम तुम्हाला आशीर्वाद देतील. रामाचा वापर मतांच्या राजकारणासाठी करू नका”, अशी टीकाही अंजनेय यांनी केली.