काँग्रेस नेते अझीझ कुरेशी यांनी खळबळजनक विधान केलं आहे. देशातील २२ कोटी मुस्लिमांपैकी एक-दोन कोटी मुस्लीम मेले तरी हरकत नाही, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं आहे. अझीझ यांच्या विधानानंतर नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे काही नेते ‘जय गंगा मैय्या’, ‘जय नर्मदा मैय्या’ अशा घोषणा देतात, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, असंही कुरेशी यांनी म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.
एका कार्यक्रमात काँग्रेस नेते अझीझ कुरेशी म्हणाले, “मला पक्षातून काढून टाकलं तरी चालेल. मला कसलीही भीती नाही. आजच्या घडीला नेहरूंचे वारसदार आणि काँग्रेसचे लोक धार्मिक मिरवणुका काढतायत. ‘जय गंगा मैय्या’, ‘जय नर्मदा मैय्या’ अशा घोषणा देतायत. ते हिंदू आहेत, असं अभिमानाने सांगतायत. ते काँग्रेसच्या कार्यालयात मूर्तीही बसवत आहेत.”
“मुस्लीम समाज हा तुमचा गुलाम नाही, हे काँग्रेससह देशातील सर्व राजकीय पक्षांनी समजून घेतलं पाहिजे. मुस्लिमांनी तुम्हाला मतदान का करावं? तुम्ही मुस्लिमांना नोकऱ्या देत नाही. त्यांना पोलीस, लष्कर किंवा नौदलात भरती करून घेत नाही. मग मुस्लिमांनी तुम्हाला मतदान का करावं?” असा सवालही कुरेशी यांनी विचारला. कुरेशी यांच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप भाजपा प्रवक्ते पंकज चतुर्वेदी यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.
काँग्रेस नेते अझीझ कुरेशी यांनी यापूर्वी उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मिझोरामचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं आहे. ते मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत ते सतना येथून खासदार म्हणूनही निवडून आले होते.