Jairam Ramesh On Waqf Board Bill : गेल्या काही दिवसांपासून वक्फ बोर्ड विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच राजकारण सुरु आहे. वक्फ बोर्ड विधेयकाला १४ बदलांसह मंत्रिमंडळाने २७ फेब्रुवारीला मंजुरी दिलेली आहे. हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत मांडण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर ते संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं. त्यानंतर समितीकडून सुचवण्यात आलेल्या शिफारशींपैकी ४४ शिफारशी नामंजूर करण्यात आल्या तर १४ बदलांसह सुधारित वक्फ बोर्ड विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे.

दरम्यान, या वक्फ बोर्ड विधेयकावरून काँग्रेसने रविवारी एक निवेदन जारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश निवेदनात म्हटलं की, वक्फ बोर्ड(दुरुस्ती) विधेयक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा संविधानावरील आणखी एक हल्ला आहे. हे विधेयक खोटा प्रचार पसरवून समाजातील सामाजिक सलोखा भंग करणे आणि अल्पसंख्याक समाजाच्या परंपरांना बदनाम करून निवडणुकीच्या फायद्यासाठी ध्रुवीकरणाची परिस्थिती निर्माण करण्याचा सरकारचा उद्देश असल्याचं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

जयराम रमेश यांनी म्हटलं की, “वक्फ (दुरुस्ती) विधेयक हा भाजपाच्या रणनीतीचा एक भाग आहे. बहु-धार्मिक समाजातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. वक्फची जमीन वक्फला देण्याबाबत जाणीवपूर्वक संदिग्धता निर्माण करण्यासाठी वक्फची व्याख्या बदलण्यात आली आहे. वक्फ बोर्ड कमकुवत करण्यासाठी विद्यमान कायद्यातील तरतुदी विनाकारण काढून टाकल्या जात आहेत. हा अल्पसंख्याक समुदायांच्या परंपरा आणि संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून निवडणुकीच्या फायद्यासाठी आपला समाज कायमचा ध्रुवीकरणाच्या स्थितीत राहील”, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.

“वक्फचे व्यवस्थापन करण्यासाठी मागील कायद्यांद्वारे निर्माण केलेल्या सर्व संस्था (राष्ट्रीय परिषद, राज्य मंडळे आणि न्यायाधिकरण) सक्रियपणे त्यांची प्रतिष्ठा, रचना आणि अधिकार कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या माध्यमातून जेणेकरून समुदायाला त्यांच्या स्वतःच्या धार्मिक परंपरा आणि व्यवहारांचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार जाणूनबुजून हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे”, असंही जयराम रमेश यांनी निवेदनात म्हटलं आहे.

“वक्फच्या उद्देशाने कोण त्यांची जमीन दान करू शकते हे ठरवण्यासाठी जाणूनबुजून अस्पष्टता आणण्यात आली आहे. ज्यामुळे वक्फची व्याख्याच बदलली आहे. वक्फ प्रशासन कमकुवत करण्यासाठी कोणत्याही कारणाशिवाय कायद्यातील तरतुदी काढून टाकल्या जात आहेत. वक्फ जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी आता कायद्यात वाढीव संरक्षण आणलं जात आहे”, असं जयराम रमेश यांनी निवेदनात म्हटलं आहे.